मुख्यमंत्रिपदाची खुर्ची अजून रिकामी नाही : सिद्धरामय्या   

नवी दिल्ली : मुख्यमंत्री पदासाठी कोणतीही जागा रिकामी नाही. मी सध्या खुर्चीवर असून पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेन, असा विश्वास कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी गुरुवारी व्यक्त केला. मागील काही दिवसांपासून कर्नाटकात नेतृत्व बदलाची चर्चा सुरू आहे. त्यातच, प्रदेश काँग्रेस प्रभारी रणदीपसिंग सूरजेवाला यांच्या कर्नाटक दौर्‍यानंतर सिद्धरामय्या दिल्लीत दाखल झाले.
 
कर्नाटकातील संभाव्य नेतृत्व बदलाबाबत पत्रकारांनी सिद्धरामय्या यांना विचारले असता प्रतिप्रश्न करताना ते म्हणाले, मुख्यमंत्रिपदासाठी सध्या खुर्ची रिकामी आहे का? मी तुमच्यासमोर कर्नाटकचा मुख्यमंत्री म्हणून उभा आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व उप मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनीही हेच म्हटले आहे आणि मी तेच म्हणत आहे. सध्या कोणतीही जागा रिकामी नाही!
 
शिवकुमार यांच्याकडे मुख्यमंत्री पदाची धुरा सोपवली जावी, अशी मागणी कर्नाटकातील काही आमदारांकडून केली जात आहे. शिवाय, सत्ता स्थापनेवेळीदेखील मुख्यमंत्री पद अडीच-अडीच वर्षे सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांच्याकडे राहील, असे ठरल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, शिवकुमार काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत.
 

Related Articles