ठाकरे गटाच्या अर्जावर ऑगस्टमध्ये सुनावणी   

धनुष्यबाण चिन्हाचा वाद

नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटाला धनुष्यबाण हे पक्ष चिन्ह दिलेल्या निर्णयाविरुद्ध उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटाने दाखल केलेल्या अर्जावर सर्वोच्च न्यायालय ऑगस्टमध्ये सुनावणी घेणार आहे.न्यायाधीश सूर्यकांत आणि जॉयमाल्या बागची यांच्या पीठासमोर हा अर्ज सुनावणीस आहे. हा मुद्दा बराच काळ प्रलंबित असून यावर अधिक अनिश्चितता ठेवता येणार नाही, असे पीठाने यावेळी सांगितले. ऑगस्टमध्ये आम्ही मूळ प्रकरणासह यावर सुनावणी घेऊ, असे सांगितले.
 
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता या प्रकरणाचा जलदगतीने निकाल लावावा अशी विनंती, उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी यावेळी केली.शिंदे गटाकडून बाजू मांडणारे वरिष्ठ वकील नीरज किशन कौल यांनी मात्र, आधीच्या पीठाने तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला होता, असे सांगितले.१० जानेवारी २०२४ रोजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे यांसह सत्ताधारी गटातील १६ आमदारांना अपात्र ठरवण्याचा शिवसेनेचा (ठाकरे गट) अर्ज फेटाळून लावला होता. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाचे सात खासदार निवडून आले. तर, विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाने ५७ जागा, भाजपने १३२ जागा आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीने ४१ जागा जिंकल्या.
 

Related Articles