वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या तरुणीवर सामूहिक बलात्कार   

सांगलीतील घटना; तिघांना अटक

सांगली : वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणार्‍या तरूणीला गुंगी येणारे पेय पाजून तिघांनी सामूहिक बलात्कार केला. मंगळवारी रात्री तिच्या मित्राच्या सदनिकेवर ही घटना घडली. याची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी तातडीने तिघा तरुणांना अटक केली आहे. यातील दोघे पीडितेच्या महाविद्यालयातच शिकत असून तिसरा संशयित त्यांचा मित्र आहे.
 
विनय विश्वेष पाटील (वय २२,  अंतरोळीकर नगर, सोलापूर), सर्वज्ञ संतोष गायकवाड (वय २०, नांदेड सिटी, पुणे), तन्मय सुकुमार पेडणेकर (वय २१, अभयनगर, सांगली) अशी आरोपींची नावे आहेत. पीडिता मूळची बेळगाव जिल्ह्यातील आहे. शहरातील एका वैद्यकीय महाविद्यालयात ती ‘शिक्षण घेते. पीडित तरुणी आणि संशयित पाटील, गायकवाड हे  त्याच महाविद्यालयात शिकत आहेत. मंगळवारी रात्री या तिघांनी तिला चित्रपट पाहण्यासाठी जाऊ, असे सांगून दुचाकीवरून वान्लेसवाडी येथील खोलीवर नेले.
 
तेथे गेल्यानंतर त्यांनी तरुणीला गुंगी येणारे पेय पाजले. त्यानंतर तरुणीवर तिघांनी बलात्कार केला. काही वेळाने तरुणी शुद्धीत आल्यानंतर तिने तेथून स्वतःची सुटका करून घेतली. त्यानंतर मध्यरात्री विश्रामबाग पोलिस ठाणे गाठले. त्यावेळी अपर पोलिस अधीक्षक रितू खोखर, विश्रामबागचे निरीक्षक सुधीर भालेराव यांनी तिची फिर्याद नोंदवत  संशयितांना अटक करण्याच्या सूचना दिल्या. विश्रामबाग पोलिसांनी अवघ्या काही तासांत तीनही संशयितांना अटक केली. विश्रामबाग पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुधीर भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली बिरोबा नरळे, प्रशांत माळी, आर्यन देशिंगकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Related Articles