उन्हाळी हंगामातील विशेष रेल्वेंचा कालावधी वाढवला   

पुणे : मध्य रेल्वेने उन्हाळी हंगामानिमित्त सोडलेल्या विशेष गाड्यांना प्रवाशांची गर्दी आजही कायम आहे. त्या पार्श्वभूमीवर या गाड्यांचा कालावधी तीन महिन्यांनी (सप्टेंबरपर्यंत) वाढविला आहे. सोलापूर, बडनेरा, नाशिक, हरंगुल, पुणे, कलबुर्गी या सहा विशेष गाड्या नियोजित मार्गावरून धावणार असल्याने या मार्गावरील रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
 
रेल्वे प्रशासनाकडून दर वर्षी उन्हाळी हंगामानिमित्त गर्दी असणार्‍या मार्गांवर विशेष रेल्वे सेवा सुरू करण्यात येते. एप्रिल महिन्यापासून २५ जूनपर्यंत अतिरिक्त रेल्वे गाड्यांचे विविध मार्गांवरील वेळापत्रक जाहीर करण्यात आले. 
 
सध्या उन्हाळी सत्र संपले असून, शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली आहे. तरी अद्याप या मार्गावरील अतिरीक्त गाड्यांना प्रवाशांची गर्दी कायम आहे. प्रवाशांकडून अतिरिक्त रेल्वे सेवा सुरू ठेवण्याबाबत आग्रही मागणी करण्यात आल्याने ज्या मार्गांवर प्रवाशांची गर्दी आहे, त्या मार्गावरील अतिरिक्त रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक तीन महिन्यांनी वाढविण्यात आले आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने पत्रकाद्वारे दिली.
 
ऑनलाईन सेवा उपलब्ध 
 
उन्हाळी सत्रात ठरविलेल्या वेळापत्रकानुसारच या अतिरिक्त गाड्या धावणार आहे. प्रवाशांना आसन आरक्षणासाठी ऑनलाईन सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती मध्ये रेल्वे विभागाकडून देण्यात आली. 

Related Articles