भारतीय महिला क्रिकेट संघाचा विजय   

ब्रिस्टल : हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघानं इंग्लंडच्या ब्रिस्टलच्या मैदानात रंगलेल्या इंग्लंडविरुद्धच्या टी-20 सामना जिंकत नवा इतिहास रचला आहे. या विजयासह भारतीय महिला क्रिकेट संघाने पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत 2-0 अशी आघाडीही घेतली. पहिल्यांदा फलंदाजी करताना मुंबईकर जेमिमा रॉड्रीग्ज आणि अमनजोत कौर या दोघींनी केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने इंग्लंडसमोर 182 धावांचे टार्गेट सेट केले होते.  या धावांचा पाठलाग करताना यजमान इंग्लंड महिला संघ 157 धावांपर्यंतच मजल मारू शकला. 
 
आतापर्यंत इंग्लंडच्या संघानं ब्रिस्टलच्या मैदानात खेळवण्यात आलेला एकही सामना गमावला नव्हता. पण त्यांची या मैदानातील बादशाहत टीम इंडियानं मोडून काढली. जे कुणाला जमलं नाही ते हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडियानं करुन दाखवलं. भारतीय संघ याआधीही या मैदानात खेळला होता. पण दुसर्‍या सामन्यात संघाने इथं पहिल्या विजयाचा डाव साधला. भारतीय संघ टी-20 क्रिकेटमध्ये ब्रिस्टलच्या मैदानात इंग्लंडला पराभूत करणारा पहिला संघ ठरला आहे. इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात सलामीवीर स्मृती मानधनासह शेफाली वर्मा स्वस्तात माघारी फिरल्यावर जेमिमा रॉड्रिग्जनं 41 चेंडूत 63 धावांची दमदार खेळी केली. याशिवाय अमनजोत कौर हिने 40 चेंडूत 63 धावांची दमदार खेळी केल्याचे पाहायला मिळाले. अखेरच्या षटकात विकेट किपर बॅटर रिचा घोष हिने 32 धावांची उपयुक्त खेळी केली.

Related Articles