वाचक लिहितात   

चेंगराचेंगरीच्या घटना दुःखद
 
ओडिशा राज्यातील पुरी येथील भगवान जगन्नाथ रथयात्रेदरम्यान श्रीगुंडीचा मंदिरासमोर भगवान जगन्नाथाच्या रथाजवळ गर्दी उसळून प्रचंड चेंगराचेंगरी झाली. यात तीन भाविकांचा मृत्यू झाला, तर ५० पेक्षा अधिकजण जखमी झाले. या दुर्दैवी घटनेमुळे देवस्थानाच्या ठिकाणी चेंगराचेंगरी होऊन देवाच्या दर्शनार्थ आलेले भक्तगण मृत्युमुखी पडल्याच्या आणखी एका घटनेची इतिहासात नोंद झाली. कारण मंदिरांच्या ठिकाणी चेंगराचेंगरी होऊन अनेक लोक मृत्युमुखी पडण्याच्या अशा प्रकारच्या दुर्दैवी घटना देशात अनेकवेळा घडल्या आहेत. अगदी अलीकडच्या काही घटना म्हणजे, २ मे २०२५ रोजी गोव्यातील शिरगाव येथील लैराई देवीच्या यात्रेत झालेल्या चेंगराचेंगरीत सात भाविकांचा मृत्यू झाला. २९ जानेवारी २०२५ रोजी प्रयागराज येथे महाकुंभ मेळ्यात चेंगराचेंगरी होऊन ३० जण प्राणास मुकले. ८ जानेवारी २०२५ रोजी तिरुपती मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत सहा जणांचा मृत्यू झाला. देवस्थानातील चेंगराचेंगरीच्या वाढत्या घटना मन विषण्ण करणार्‍या आहेत.
 
प्रदीप मोरे, अंधेरी (पूर्व), मुंबई
 
सुरक्षित संधीच्या शोधात संशोधक
 
अमेरिका सुपरपॉवर असल्याचे सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे अमेरिकेत सर्वाधिक संख्येने असलेले संशोधक आणि वैज्ञानिक. त्यांची प्रतिभा आणि विज्ञानात त्यांनी मोठ्या प्रमाणात केलेले संशोधने यामुळेच संपूर्ण जगात अमेरिकेचा दबदबा आहे. अनेक मूलभूत संशोधने आणि शोध अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनीच लावलेले आहेत. अमेरिका ‘सुपर पॉवर’ आहे. परंतु सध्या अमेरिकेत काय स्थिती आहे? संशोधकांचा देश म्हणून ओळखला जाणारा देश. अमेरिका सुपर पॉवर होण्यात या संशोधकांचा वाटा सर्वांत मोठा आहे. परंतु आजपर्यंतचा सर्वाधिक अस्वस्थ काळ अमेरिकेत चालू आहे. आजवर उच्च शिक्षणासाठी आणि संशोधनासाठी जगभरातील प्रतिभावंत अमेरिकेकडे धाव घेतात. पण सध्या उलटेच होताना दिसते. आपल्यासाठी, संशोधनासाठी हा देश योग्य नाही असे अमेरिकेतल्याच बहुसंख्य संशोधकांना वाटते. त्यामुळे हे संशोधक अमेरिका सोडून दुसर्‍या विकसित आणि सुरक्षित देशांना पसंती देत आहेत. गेल्या सुमारे 80 वर्षांत पहिल्यांदाच अमेरिकेला ’ब्रेनड्रेन’चा सामना करावा लागतो आहे. अर्थातच पुन्हा एकदा त्याचं कारण आहे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची संशोधनविषयक नीती अनेक संशोधकांनी आधीच देश सोडला आहे. जवळपास 75 टक्के संशोधक युरोप किंवा आशियात संशोधनासाठी सुरक्षित संधी शोधत आहेत. 
 
दत्तप्रसाद शिरोडकर, मुंबई
 
बळीचे राज्य येवो
 
दरवर्षी १ जुलै हा दिवस संपूर्ण राज्यात कृषी दिन म्हणून साजरा केला. आज शेतीची आणि शेतकर्‍यांची अवस्था दयनीय आहे. आस्मानी आणि सुलतानी संकटांनी बळीराजा पिचला  आहे. शेतकरी हा शब्द बोलायला जेवढा सोप्पा आहे तेवढा सोप्पा नाही. शेती करताना अचानक येणार्‍या संकटांचा सामना शेतकर्‍यांना करावा लागतो. त्यात बेमोसमी पाऊस, ओला दुष्काळ,  कोरडा दुष्काळ, गारपीट, बाजार पेठेतील बाजारभावात होणारी घसरण, शेतीसाठी सावकाराकडून किंवा बँक, पतसंस्था इत्यादींकडून घेतलेले कर्ज परतफेडीची मुदत, निर्यातीत होणारे शासकीय बदल या व अशा सर्व संकटाला शेतकरी सामोरे जात असतो. हवामानात अचानक होणार्‍या बदलांमुळे शेतीतील पिकांचे नुकसान होते. कर्जाच्या बोज्याखाली अडकून बळीराजा आत्महत्या करतो. महाराष्ट्रासारख्या कृषिप्रधान राज्यात सर्वाधिक शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकर्‍यांना कोणी वाली नाही अशी भावना शेतकर्‍यांची झाली आहे. हे चित्र बदलायला हवे. पुन्हा एकदा इडा पीडा टळो बळीचे राज्य येवो हा आवाज घराघरातून घुमायला हवा.
 
श्याम ठाणेदार, दौंड जि. पुणे
 
वीज ग्राहकांना दिलासा?
  
महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाच्या आदेशामुळे औद्योगिक आणि व्यावसायिक वीज दरात कपात झाल्याच्या बातम्या येत आहेत. घरगुती वर्गवारीतील वीजग्राहकांनाही त्याचा दिलासा मिळणार आहे. शंभर युनिटच्या आत वीज वापर असलेल्या ग्राहकांची वीजबिले कमी होणार आहेत. मात्र शंभर युनिटच्या आत ज्यांचा वीज वापर आहे अशा ग्राहकांना प्रति युनिट ६.३२ रुपये ऐवजी ५.७४ रुपये युनिट या दराने वीज बिल वाढले जाणार आहे. मात्र त्यापुढे वीज वापर असलेल्या ग्राहकांना १०१ ते ३०० युनिट वापरासाठी १२.२३ रुपये ऐवजी १२.५७ रुपये प्रति युनिट दराने वीज बील आकारले जाणार आहे. मात्र हा दिलासा काही काळापुरताच न टिको. अन्यथा पुढील वर्षी पुन्हा वीज दरातील वाढीचा धक्‍का ग्राहकांना सहन करावा लागेल.
 
प्रतीक नगरकर, पुणे

Related Articles