आखाती युद्धामुळे गृहोपयोगी वस्तू महागणार   

वृत्तवेध 

मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे भारतासह जागतिक अर्थव्यवस्थेची चिंता वाढली आहे. ‘एफएमसीजी’ कंपन्यांना भीती आहे, की या तणावामुळे कच्च्या तेलाच्या आणि इतर कच्च्या मालाच्या किमती वाढू शकतात. त्यामुळे साबण, बिस्किट, तेल, पॅकेजिंग उत्पादने यांसारख्या दैनंदिन वस्तूंच्या किमती वाढू शकतात.
 
‘गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्स’चे वरिष्ठ अधिकारी कृष्णा खटवानी म्हणाले की मध्य पूर्वेतील तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढू शकतात. गोदरेज सिंथॉल साबण आणि गुडनाईटसारखी उत्पादने बनवते. यामुळे या उत्पादनांच्या किमती वाढतील आणि ग्राहकांवर अतिरिक्त भार पडेल. परिणामी, मागणी वाढण्याची आशा धुळीस मिळू शकते. गेल्या पाच तिमाहींपासून कमकुवत मागणीचा सामना करणार्‍या कंपन्यांनी अलीकडेच मागणीमध्ये सुधारणा होण्याची आशा व्यक्त केली होती. यामागील कारण म्हणजे रिझर्व्ह बँकेने रेपो दरात केलेली कपात, सरकारची करसवलत आणि लवकर आलेला मान्सून; पण आता पश्चिम आशियातील संकट या उदयोन्मुख पुनर्प्राप्तीला ब्रेक लावू शकते.
 
‘बिस्लेरी इंटरनॅशनल’चे ‘सीईओ’ अँजेलो जॉर्ज म्हणाले की, मध्य पूर्वेतील ऊर्जा पायाभूत सुविधांवर परिणाम झाल्यामुळे तेल पुरवठ्यात व्यत्यय येऊ शकतो. यामुळे प्लास्टिक पॅकेजिंगसारख्या पेट्रोलियम-डेरिव्हेटिव्ह उत्पादनांची किंमत वाढेल. परिणामी, बिस्लेरीसारख्या कंपन्यांचे थेट नुकसान होऊ शकते. अलीकडेच ‘बिस्लेरी’ने दुबईच्या रिटेल साखळीशी भागीदारी करून पश्चिम आशिया आणि आफ्रिकेमध्ये विस्ताराची घोषणा केली होती; परंतु सध्याची परिस्थिती या विस्तारावरही परिणाम करू शकते. ‘डाबर इंडिया’चे सीईओ मोहित मल्होत्रा म्हणाले की ते परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. अन्नधान्य महागाई अलीकडेच सात महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आली असून चांगला मान्सून आणि सरकारी प्रोत्साहनाच्या शक्यतेमुळे मागणी वाढण्याची अपेक्षा होती. कंपन्या  कच्च्या मालाची सहा महिन्यांची इन्व्हेंटरी जवळ ठेवतात; परंतु कच्च्या तेलाचा पुरवठा विस्कळीत झाला किंवा किमती अस्थिर राहिल्यास इन्व्हेंटरी खर्च वाढू शकतो आणि शहरी बाजारपेठेत पुनर्प्राप्तीची शक्यता कमी होऊ शकते.

Related Articles