प्रवाशांनी भरलेली बस नदीत कोसळली   

रुद्रप्रयागमध्ये दोघांचा मृत्यू, १०हून अधिक बेपत्ता, प्रत्यक्षदर्शीमुळे समजली दुर्घटना

रुद्रप्रयाग : उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग येथे दुर्घटना घडली. बद्रीनाथ महामार्गावरून जाणारा एक टेम्पो ट्रॅव्हलर अलकनंदा नदीत कोसळला. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून आठ जणांना वाचवले. तर सुमारे दहा जण बेपत्ता आहेत. घटनास्थळी युद्ध पातळीवर बचावकार्य सुरू असून एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या टीम घटनास्थळी दाखल झाल्या.

प्रवाशांनी भरलेला टेम्पो नदीत कोसळला

टेम्पोमध्ये चालक आणि कंडक्टरसह १९ लोक होते, त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला. एका मृताचा मृतदेह रुद्रप्रयाग संगममध्ये सापडला. अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना शासनाकडून आर्थिक मदत जाहीर केली.रुद्रप्रयाग येथे झालेल्या बस अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली. प्रशासनाकडून बचावकार्य जलद गतीने सुरू आहे. जखमी झालेल्या लोकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी बचाव पथके नदीत शोध घेत आहेत.

प्रत्यक्षदर्शीने टेम्पो नदीत कोसळताना पाहिला 

ही दुर्घटना घोलतीर गावाजवळ झाली. प्रत्यक्षदर्शींनी टेम्पो नदीत पडताना पाहिला आणि तात्काळ याची माहिती पोलिसांना दिली. सकाळी सुमारे ७ वाजून ५५ मिनिटांनी आपत्कालीन नियंत्रण कक्ष रुद्रप्रयाग येथून माहिती मिळाली की बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गावर घोलतीरजवळ एक प्रवासी वाहन दुर्घटनाग्रस्त झाले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. मुख्यमंत्री धामी यांनाही या अपघाताची माहिती दिली. या अपघाताच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. चौकशी करण्यासाठी समिती नेमली असून प्रशासनाकडून अधिक माहिती मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
 
या दुर्घटनेमुळे प्रशासनाने वाहन चालकांना सुरक्षा मानकांचे पालन करण्याचे आवाहन केले. या अपघातानंतर प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली असून अपघाताच्या कारणांचा शोध घेऊन दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन प्रशासनाने दिले. उत्तराखंडमधील या दुर्घटनेमुळे देशभरात हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles