घोडेगावात दूषित पाण्यामुळे शेकडो नागरिकांना उलट्या जुलाब   

आरोग्य विभागाकडून परिस्थिती नियंत्रणात 

भीमाशंकर, (वार्ताहर) : घोडेगाव येथे दूषित पाणीपुरवठा होत असल्याने शेकडो नागरिकांना उलट्या व जुलाबाचा त्रास झाला. याची माहिती मिळताच तालुका आरोग्य विभागाने त्वरीत कर्मचार्‍यांच्या पथकांची नियुक्ती करत घर टू घर उपचाराला सुरुवात केली असून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. गटविकास अधिकारी अर्चना कोल्हे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
 
घोडेगाव ग्रामपंचायतीचे लोकप्रतिनिधी, अधिकारी यांच्या दुर्लक्षपणामुळे सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या टाकीत टीसीयल विलीन करून स्वच्छ केले नसल्याने पाणी पूर्णतः दूषित झाले आहे. अन् तेच पाणी नळाद्वारे दिल्याने ग्रामस्थांना जुलाब, उलट्या, मळमळ व चक्कर येत असल्याचे रुग्णानी सांगितले. तसेच नळाद्वारे देण्यात आलेल्या पाण्याचे नमुने तपासायला दिले असता पाणी दूषित निघाले आहे. 
 
तालुका आरोग्य विभागाची सहा पथके घोडेगाव परीसरामध्ये घरोघरी जुलाब, उलट्यांचा त्रास असणार्‍या व्यक्तिंचा सर्व्हे करत आहेत तसेच डेंग्यू प्रतिबंधासाठी देखील पाहणी करत आहेत. आत्तापर्यंत घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात २२ रुग्णांनी उपचार घेतले असून, यातील १६ रूग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तसेच आरोग्य पथके घरोघरी पाहणी करत असून यातील २३१ रूग्णांवर घरीच पथकाने उपचार केले असून यातील २१० रूग्ण बरे झाले आहेत तर पाच रूग्णांचे शौच नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत.
 
घोडेगाव ग्रामपंचायतीला पाण्याच्या टाकीची स्वच्छता करून लिकेज असणारे वॉल त्वरीत दुरूस्त करण्याच्या सूचना दिल्या आहेत तसेच डास प्रतिबंधक धूर फवारण्याच्या सूचना देखील गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांच्या मार्फत देण्यात आल्या आहेत.
 

Related Articles