भारत-ऑस्ट्रेलिया एकदिवसाच्या सामन्यांच्या सर्व तिकिटांची विक्री   

ब्रिस्बेन : ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार्‍या भारत-ऑस्ट्रेलिया व्हाइट-बॉल मालिकेला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः भारतीय संघातील विराट कोहली आणि रोहित शर्मासारख्या स्टार खेळाडूंना पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. कारण विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे आणि ते फक्त वनडे सामने खेळताना दिसणार आहेत. परिणामी, मालिकेला अजून चार महिने बाकी असतानाच काही सामन्यांची तिकिटं संपली आहेत. कारण तिकीट विक्रीला सुरुवात झाल्यानंतर अवघ्या दोन आठवड्यांत आठ सामन्यांसाठी 90,000 हून अधिक तिकिटं विकली गेली आहेत.मालिकेला अजून चार महिने बाकी असताना सिडनी क्रिकेट ग्राउंडवरील  वनडे आणि कॅनबेरा येथील मनुका ओव्हल येथील टी-20 सामन्याची सर्व तिकिटे आधीच विकली गेली आहेत. 
 
मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवरील आणि ब्रिस्बेनमधील गाबा स्टेडियमवरील टी-20 सामन्यांसाठीही तिकिटांची मागणी वेगाने वाढत आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या माहितीनुसार, फक्त दोन आठवड्यांत 8 सामन्यांसाठी 90,000 हून अधिक तिकिटं विकली गेली आहेत. यामध्ये सर्वाधिक योगदान भारतीय चाहत्यांचं आहे. भारत आर्मी आघाडीवर असून त्यांनी 2,400 हून अधिक तिकिटं घेतली आहेत, तर फॅन्स इंडियाने 1,400 हून अधिक तिकिटं बुक केली आहेत. एकट्या भारतीय फॅन क्लब्सकडून विकल्या गेलेल्या तिकिटांची टक्केवारी 16% पेक्षा अधिक आहे. या मालिकेदरम्यान, ऑस्ट्रेलियातील स्टेडियम्स पुन्हा एकदा ब्लू आर्मीने गजबजणार असून, विराट-रोहितच्या फटकेबाजीत रंगणार्‍या सामन्यांसाठी वातावरण आधीच तापायला सुरुवात झाली आहे.आधी भारताच्या ऑस्ट्रेलिया दौर्‍याचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. टीम इंडिया 19 ऑक्टोबर ते 8 नोव्हेंबर या कालावधीत 21 दिवसांत एकूण 8 सामने खेळेल. एकदिवसीय मालिकेअंतर्गत एकूण 3 सामने खेळवले जातील तर टी-20 मालिकेत 5 सामने आयोजित केले जातील.  
 
भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा (3 एकदिवसीय सामने)
 
19 ऑक्टोबर: पहिला एकदिवसीय सामना, पर्थ 
23 ऑक्टोबर: दुसरा एकदिवसीय सामना, अ‍ॅडलेड
25 ऑक्टोबर: तिसरा एकदिवसीय सामना, सिडनी 
 
भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा (5 टी-20 सामने)
29 ऑक्टोबर: पहिला टी-20  सामना, कॅनबेरा
31 ऑक्टोबर: दुसरा टी-20 सामना, एमसीजी
2 नोव्हेंबर: तिसरा टी-20 सामना, होबार्ट 
6 नोव्हेंबर: चौथा टी-20 सामना, गोल्ड कोस्ट 
8 नोव्हेंबर: पाचवा टी-20 सामना, गाबा 

Related Articles