पुरंदावडेत रंगला माउलींच्या पालखीचा रिंगण सोहळा   

सूर्यकांत आसबे

सोलापूर : मृदंगावरील थाप, टाळ्यांचा कडकडाट, वार्‍यावर फडफडणार्‍या पताका आणि ज्ञानोबा माऊली तुकाराम अशा अखंड जयघोषाने भारावून गेलेले वातावरण, चौफेर सुसाट वेगाने रिंगण पूर्ण करणारे अश्व, अशा उत्साही वातावरणात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगण माळशिरस तालुक्यातील पुरंदावडे येथे मोठ्या भक्तीमय वातावरणात पार पडले. अश्वाने रिंगणात धाव घेताच माउली माउलीचा अखंड जयघोष झाला. डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला, विणेकरी, टाळकरी यांच्या रिंगणातील फेर्‍या झाल्यानंतर अश्वाने धाव घेतली आणि रिंगण सोहळा पार पडला.
 
मंगळवारी सकाळी शंभू महादेवाच्या नातेपुते नगरीमधून माउलींचा पालखी सोहळा पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाला. दुपारी पुरंदावडे येथील पहिल्या रिंगण सोहळ्याची वारकर्‍यांना प्रचंड उत्सुकता लागून राहिली होती. दुपारी रिंगण सोहळ्यासाठी माउलींचा सोहळा पुरंदावडेत दाखल झाला, आणि हजारो वारकर्‍यांच्या आणि भक्तांच्या उपस्थितीत अश्वाने रिंगण पूर्ण करून अखंड माउलींचा जयघोष झाला.
 

Related Articles