महिला पोलिस अधिकार्‍याचा भाजप सरचिटणीसकडून विनयभंग   

फरासखाना पोलिसात गुन्हा

पुणे : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यक्रमादरम्यान भाजपचे पुणे शहर सरचिटणीस प्रमोद कोंढरे याने एका वरिष्ठ महिला पोलिस अधिकार्‍याचा विनयभंग केल्याची घटना सोमवारी घडली. या प्रकरणी फरासखाना पोलिसांनी त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. 
 
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या २३ जूनच्या कार्यक्रमासाठी भाजप नेते शनिवार वाडयाच्या परिसरात आले होते. त्यावेळी भाजपचे कसबा पेठेतील आमदार हेमंत रासने हे सुध्दा होते. रासने हे कार्यकर्त्यांसह बंदोबस्ताला असणार्‍या पोलिसांसह चहा पिण्यासाठी एका दुकानात गेले. तेव्हा गर्दीचा फायदा घेत कोंढरे याने महिला पोलिस अधिकार्‍याचा विनयभंग केला, असे तक्रारीत म्हटले आहे. कोंढरे याने महिला पोलिस अधिकार्‍याला दोनदा लज्जा उत्पन्न होईल असा स्पर्श केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी महिला पोलिस अधिकार्‍यांनी वरिष्ठांना माहिती दिली. त्यानंतर चहाच्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात आल्याची माहिती समजते. महिला पोलिस अधिकार्‍याने पोलिस आयुक्तांना याची माहिती दिली. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी कोंढरे याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. 

Related Articles