मोकळे भूखंड बनले डम्पिंग स्टेशन   

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील मोकळे भूखंड डम्पिंग स्टेशन बनल्याचे दिसत आहेत. कचरा, बांधकामाचा राडारोडा, इलेक्ट्रॉनिक वेस्ट राजरोसपणे येथे फेकले जात असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यावर कोणाचाच निर्बंध नसल्याने येथे कचर्‍याचे ढीग वाढताना दिसत आहेत. टाकणारे टाकून जात आहेत; मात्र त्याचा त्रास आसपास राहणार्‍या नागरिकांना होत आहे. मात्र त्याबाबत तक्रार कोणाकडे करायची असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. कोणी त्याबाबत हटकले तर तुमचा काय संबंध, अशी उर्मट उत्तरे ऐकायला मिळत आहेत.
 
महापालिका हद्दीतील सर्वच प्रभागामध्ये जिथे जागा मोकळी दिसेल तेथे स्वयंघोषित कचराकुंड्या निर्माण झाल्या आहेत. याठिकाणी हॉटेल वेस्ट रात्रीच्या अंधारात आणून टाकण्यात येत आहे. मोठ्या हॉटेलमधीलच वेस्ट उचलण्यासाठी महापालिका आरोग्य विभाग प्राधान्य देत असल्याने आणि काहीवेळा हा कचरा उचलण्यासाठी आर्थिक देवाण-घेवाण करावी लागत असते. प्रत्येकाला ते परवडेल असे नसल्याने तो कचरा रात्रीच्या अंधारात शहरात असणार्‍या मोकळ्या जागेमध्ये फेकण्यात येत आहे. तसेच इतर कचराही मोकळ्या जागेत फेकला जातो. तसेच बांधकामाचा राडारोडा असो या इलेक्ट्रॉनिक वेस्ट ही याठिकाणी न घाबरता टाकण्यात येत असल्याचे निदर्शनास येत आहे.
 
यावर मोकाट जनावरांचा वावरही वाढला आहे. काही ठिकाणी हा कचरा अस्ताव्यस्त पडल्यामुळे तेथे दुर्गंधी निर्माण होऊन परिसरात राहणार्‍या नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. बिनधास्तपणे मोठ्या वाहनातून कचरा मोकळ्या भूखंडावर डम्प करण्यात येतो. उघड्या डोळ्यांनी पाहूनही कोणी त्यावर बोलत नाही. बोलायला गेल्यास तुमचा काय सबंध , तुमची जागा आहे का असा प्रश्न विचारण्यात येत असल्याने दुसर्‍यांदा ते कचरा टाकण्यास आल्यावर उघड्या डोळ्यांनी दिसत असतानाही कोणी या गोष्टीला विरोध करताना दिसत नसल्याने शहरातील मोकळे भूखंड डम्पिंग स्टेशन बनताना दिसत आहेत.
 
महापालिकेचा कानाडोळा
 
ज्यांचे कोणाचे भूखंड आहेत त्यांनी त्या जागेवर फलक लावणे आवश्यक आहे. जे प्रशासकीय जागा आहेत त्याठिकाणी ही या गोष्टीला निर्बंध घालण्यासाठी संबंधित स्वायत्त संस्थांनी पुढाकार घेतला पाहिजे. असे कोणी कचरा, बांधकाम राडारोडा, इलेक्ट्रॉनिक  वेस्ट असो वा हॉटेल वेस्ट टाकण्याचा प्रयत्न केला तर त्याला रंगेहाथ पकडणे आवश्यक आहे. त्यासाठी संबंधित प्रशाकीय व्यवस्थेने व्हॉट्सअप नंबर पब्लिश करून संबंधितांचे व्हिडीओ टाकण्यासाठी आवाहन करून त्यांचे नंबर गुपित ठेवण्याचे जर प्रयोजन केले तर निश्चित या गोष्टीना आळा बसेल असा मतप्रवाह आहे. त्यासाठी शहरातील महापालिका, पोलीस प्रशासन या इतर प्रशासनाने त्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक असल्याच्या प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांच्यातून उमटल्या आहेत.

Related Articles