तेलंगणात कारखान्यातील स्फोटात १२ जणांचा मृत्यू   

 

३४ कामगार जखमी; काहींची प्रकृती गंभीर
 
संगारेड्डी, (तेलंगणा) : तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यात एका औषध कारखान्यात सोमवारी सकाळी भीषण स्फोट झाला. या स्फोटात बारा जणांचा मृत्यू झाला असून, ३४ जण जखमी आहेत. यापैकी, काहींची प्रकृती गंभीर आहे, अशी माहिती तेलंगणाचे आरोग्य मंत्री दामोदर राजा नरसिंह यांनी दिली. पशामिलाराम औद्योगिक वसाहतीतील सिगाची फार्मा कंपनीत हा स्फोट झाला. कारखान्यात अनेक जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात असून युद्धपातळीवर मदत आणि बचाव कार्य सुरू आहे, असे कामगार मंत्री जी. विवेक वेंकटस्वामी यांनी सांगितले.
 
अपघातस्थळावर दहा जणांचे मृतदेह सापडले असून अन्य दोघांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला, असे अग्निशमन विभागाच्या अधिकार्‍याने सांगितले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यात काही किरकोळ जखमी झाले असून काहींची प्रकृती गंभीर आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्फोट इतका भीषण होता की, आवाज कित्येक किलोमीटर दूरपर्यंत ऐकू आला. सकाळी ९.२८ ते ९.३५ च्या दरम्यान हा स्फोट झाला. त्यावेळी कारखाना परिसरात १५० हून अधिक कामगार होते. तर, ज्या भागात स्फोट झाला त्या ठिकाणी ९० कामगार उपस्थित होते, असे पोलिस महानिरीक्षक व्ही. सत्यनारायण यांनी सांगितले.
 
स्फोटानंतर तातडीने अग्निशमन दलाचे दहा बंब घटनास्थळी दाखल झाले. तसेच, एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे कर्मचारीही पोहोचले. या सर्वांच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आली.या घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे. तसेच, मृतांच्या वारसांना दोन लाख आणि जखमींना ५० हजारांची मदत पंतप्रधान कार्यालयाकडून जाहीर करण्यात आली. मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनीदेखील घटनेबद्दल दुःख व्यक्त केले. कारखान्यात अडकलेल्या कामगारांना वाचवण्यासाठी आणि जखमींवर तातडीने उपचार मिळावेत यासाठी मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकार्‍यांना योग्य ती सर्व पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. सिगाची इंडस्ट्रीज लिमिटेड ही एक औषध कंपनी आहे.
 

Related Articles