वाचक लिहितात   

भाजपसाठी भ्रष्टाचार हाच शिष्टाचार?

राजकारणातील गुन्हेगारी विरोधाचा ’झिरो टॉलरन्स’ असावा. राहुल गांधी यांनी भ्रष्ट नेत्यांना निवडणूक लढवता येणार नसल्याच्या आपल्याच ’यूपीए’ सरकारच्या काळातील अध्यादेश भर पत्रकार परिषदेत फाडला. त्यावर भाजप नेते राहुल गांधी यांच्यावर आजही ’अपरिपक्व नेता’ अशी टीका तर करतात; मात्र गुन्हेगारी - भ्रष्टाचार प्रकरणांमध्ये दोषी ठरविण्यात आलेल्या आमदार आणि खासदारांवर आजन्म निवडणूक लढविण्यास बंदी नको, अशा आशयाचे प्रतिज्ञापत्र भाजपप्रणीत मोदी सरकारने सर्वोच्च न्यायालयात सादर केले आहे. असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉमच्या अहवालातून ताज्या लोकसभेत भ्रष्टाचार तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले सर्वाधिक सदस्य भाजप पक्षाचे आहेत. फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात देखील ६२ टक्के मंत्री गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याची माहिती असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉम्स आणि ’महाराष्ट्र इलेक्शन वॉच’ या संस्थेच्या अहवालातून समोर आली आहे. ’राज्यात राजकारणाचे अवमूल्यन’ झाले असून त्याबाबत सर्वांनीच विचार करायला हवा, असे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. यास एक महिना उलटत नाही, तोच फडणवीस यांनी अनुक्रमे सुधाकर बडगुजर, बबनराव घोलप या कलंकित गणंगांना आपल्या भाजप पक्षात पावन करून घेतले आहे. साधनसुचितेचा आव आणणार्‍या आणि पार्टी विथ द डिफरन्सचा टेंभा मिरवणार्‍या भाजपसाठी भ्रष्टाचार हाच आता शिष्टाचार झाला आहे का?
 
बाळकृष्ण शिंदे, पुणे 
 
सुसंस्कार घरातूनच
 
जे मुला-मुलींच्या जीवनाला देतात आकार त्यांना म्हणतात सुसंस्कार. संस्कार आणि सुसंस्कार या एकाच नाण्याच्या दोन बाजू वाटत असल्या तरी त्यात फरक आहे. संस्कार हे समाजाकडून, शाळेकडून, मित्र परिवाराकडून मिळत असतात; मात्र सुसंस्कार हे घरातील आई-बाबा तसेच आजी-आजोबा यांच्याकडूनच मिळतात. आई-बाबा हे सुसंस्काराचे जनक असतात. त्यांच्या प्रत्येक उपदेशात सुसंस्कार हे पेरलेले असतात. मुला-मुलींसाठीच्या त्यांच्या प्रत्येक कृतीत विधायक, सकारात्मकता भरलेली असते.
 
धोंडीरामसिंह राजपूत, वैजापूर
 
सत्तेसाठी काहीही...
 
गेले काही दिवस, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि भाजपबरोबर हातमिळवणी केलेले अजित पवार एकत्र येणार अशा चर्चा रंगल्या होत्या; पण या सर्वाला खुद्द शरद पवारांनीच पूर्णविराम दिला आहे. शरद पवार म्हणाले की, सत्तेसाठी भाजपबरोबर जाऊन बसायचे, ही भूमिका कोणी मांडत असेल तर हा राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार नाही. अशा संधीसाधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही आणि अशांशी हातमिळवणी केली जाणार नाही, असे त्यांनी सांगितले. अजित पवार यांनी आपल्यावरील आरोपांची चौकशी होऊ नये, म्हणून भाजपसारख्या भ्रष्ट पक्षात केवळ सामीलच झाले नाहीत, तर त्यांच्यावरील गैरव्यवहाराचे डागदेखील पुसले गेले. त्याशिवाय उपमुख्यमंत्री या पदावर त्यांची नेमणूक देखील झाली. काही व्यक्ती सत्तेसाठी काहीही करू शकतात. हाच काका आणि पुतण्यांमधील मनोवृत्तीचा फरक.
 
गुरुनाथ मराठे, बोरिवली (पूर्व), मुंबई.
 
पालकांची भूमिका महत्त्वाची
 
यंदाच्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीसच दोन बातम्यांनी शिक्षणव्यवस्थेकडे पाहण्याच्या समाजातील दोन टोकांच्या प्रवृत्ती अधोरेखित केल्या. एकीकडे नालासोपारा येथील एका जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकाने आपल्या मुलाला पहिल्या दिवशी खासगी शाळेत सोडण्यासाठी ‘रोल्स रॉईस’ कार वापरली, तर दुसरीकडे अंबेजोगाई येथील क्लास वन अधिकारी व प्राध्यापिका या दाम्पत्याने आपल्या मुलीला जिल्हा परिषद शाळेतच प्रवेश दिला. या दोघांमध्ये केवळ आर्थिक स्थितीचा नव्हे, तर शिक्षणाची समजूत आणि सामाजिक भान यांचा मूलभूत फरक स्पष्ट होतो. विशेष म्हणजे जे पालक ‘रोल्स रॉईस’मधून मुलाला आणतात, ते स्वतः सरकारी शाळेचे शिक्षक आहेत! म्हणजेच, ते ज्या व्यवस्थेचा भाग आहेत, त्याच्यावर त्यांचा स्वतःचा विश्वास नाही, असेच चित्र उभे राहते. हा एक प्रकारचा शैक्षणिक दांभिकपणा म्हणावा लागेल. याउलट, उच्चपदस्थ असलेल्या दुसर्‍या दाम्पत्याने आपल्या कृतीतून ‘सरकारी शाळाही दर्जेदार शिक्षण देऊ शकते’ हा समाजाला विश्वास देणारा संदेश दिला आहे. शिक्षण हे फक्त वर्गखोल्यांमध्ये नव्हे, तर पालकांच्या कृतीतून घडते, हे त्यांनी दाखवून दिले.
 
दीपक गुंडये, वरळी.
 
शरद पवार यांची ठाम भूमिका
 
‘भाजपची सोबत नकोच’ अशी ठाम भूमिका ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी घेतल्याचे वृत्त वाचून समाधान वाटले. अलीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्या एकत्र येण्याच्या बातम्यांची पेरणी सुरू होती. त्यामुळे चर्चांना फारच उधाण आले होते. दोन्ही गटाकडून याबाबत संदिग्ध, गुळमुळीत प्रतिक्रिया येत होत्या. त्यामुळे पुरोगामींना खूपच चिंता वाटत होती! परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी याबाबत ’सत्तेसाठी भाजपसोबत जाणार नाही’ असा निःसंदिग्ध खुलासा केल्याने महाराष्ट्राच्या राजकारणातील चिंतेचे आणि अनिश्चिततेचे मळभ दूर होण्यास निश्चितच मदत झाली आहे!
 
श्रीकांत जाधव, अतीत (जि.सातारा)

Related Articles