अमेरिकेला चपराक लगावली   

खामेनी यांचा दावा

दुबई : इस्रायलविरुद्धच्या युद्धात आम्ही विजय मिळविला, अशी घोषणा करताना इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खामेनी यांनी कतारमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ला करुन आम्ही अमेरिकेच्या तोंडावर थप्पड लगावली, असा दावा केला.अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर इराण आणि इस्रायलमध्ये १२ दिवसानंतर युद्धबंदी झाली. त्यानंतर, खामेनी यांची आलेली ही पहिलीच टिप्पणी आहे. 
 
इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीवर काल त्यांचा एक संदेश प्रसारित करण्यात आला. १९ जूननंतर त्यांचे प्रथमच जगाला दर्शन झाले. खामेनी ८६ वर्षांचे असून, इराण आणि इस्रायलमधील संघर्ष आणि या संघर्षात अमेरिकेने घेतलेल्या थेट उडीनंतर खामेनी काहीसे थकलेले दिसत आहेत. या संदेशात खामेनी मोठ्या आवजात बोलताना आणि अडखळतानाही दिसत आहेत. सुमारे दहा मिनिटांचे त्यांचे भाषण अमेरिका आणि इस्रायलला उद्देशून इशारे आणि धमक्यांनी भरलेले होते. 
 
युद्धबंदीच्या वाटाघाटींमध्ये ट्रम्प होते. युद्धात हस्तक्षेप केला नाही तर, इस्रायलमधील राजवट पूर्णपणे नष्ट होईल, असे त्यांना वाटले. त्यासाठी ते युद्धातदेखील उतरले. पण, त्यांना काहीही साध्य करता आले नाही, असेही खामेनी म्हणाले.इस्रायलविरुद्धच्या युद्धात आम्ही विजयी झालो आहोत. अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ला करुन आम्ही त्यांना चपराक लगावली असून त्यांच्या तळांवर कधीही कारवाई करु शकतो, हे दाखवून दिले आहे. ही कृती भविष्यात पुन्हा होऊ शकते. कोणताही आक्रमक प्रकार घडला तर शत्रूला निश्चितच मोठी किंमत मोजावी लागेल, असेही ते म्हणाले. दरम्यान, युद्धबंदीनंतर इराणमध्ये जीवन हळूहळू सामान्य होत आहे. तसेच, युद्ध सुरू झाल्यापासून इराणने बंद केलेले त्यांचे हवाई क्षेत्र अंशतः पुन्हा उघडले आहे. तेहरानमधील दुकाने पुन्हा उघडण्यास सुरुवात झाली असून रस्त्यांवर वाहतूकदेखील दिसत आहे.
 

Related Articles