राज्यातील १५० भाविक यमुनोत्री धाममध्ये अडकले   

यमुनोत्री : उत्तराखंडमध्ये ढगफुटीनंतर मुसळधार पावसामुळे आणि दरड कोसळल्यामुळे यमुनोत्री धामसह अनेक भागांत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. रस्ते खचले असून, नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहेर्.ं उत्तराखंडमध्ये गेलेले देशभरातील ६०० भाविक यमुनोत्री धाम अडकले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील १५० पर्यटकांचा समावेश आहे. 
 
उत्तरखंडमध्ये रविवारी ढगफुटी झाली होती. त्यानंतर दरड कोसळली होती. मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरू आहे. यमुनोत्री धाममध्ये हवामान विभागाकडून ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. तसेच, पुढील तीन दिवस अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.यमुनोत्री धाममध्ये नद्यांना मोठा पूर आला असून, रस्ते खचले आहेत. काही ठिकाणी रस्त्यावरील छोटे पूल तुटले आहेत. त्यामुळे ठिक ठिकाणी पर्यटक, भाविक अडकले आहेत. 
 
यमुनोत्री धाममध्ये राज्यातील २०० प्रवाशी अडकल्याची माहिती समोर आली आहे. त्यामध्ये मुंबईमधील ५० जणांचा समावेश आहे. या पर्यटकांच्या चित्रफिती समोर आल्या आहेत. यामध्ये ते राज्य सरकारकडे मदतीची मागणी करत आहेत.  यमुनोत्री धामवरून परतणार्‍या ६०० हून अधिक नागरिकांना तेथेच थांबवण्यात आले आहे, असे स्थानिक प्रशासनाने म्हटले आहे. 
 
यमुना आणि गंगा नद्यांचे जलस्तर वाढल्याने पूर आणि दरडी कोसळण्याचा धोका वाढला आहे. देहरादून, नैनीताल, हरिद्वार, टिहरी, चमोली, रुद्रप्रयाग, बागेश्वर, चंपावत आणि उधमसिंग नगरसह अनेक जिल्ह्यांत हवामान खात्याने ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे.  राज्यात अनेक ठिकाणी रस्ते खचले असून, दरड कोसळल्यामुळे मार्ग बंद झाले आहेत. प्रशासनाने यमुनोत्री धामचा रस्ता तात्काळ बंद केला आहे.

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पावले : शिंदे

राज्यातील पर्यटकांच्या सुटकेसाठी आणि त्यांना सुरक्षित स्थळी पोहोचविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. ते म्हणाले, सुमारे दीडशे जण यमनोत्री परिसरात अडकले आहेत. त्यापैकी सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथील एकाशी मी बोललो आहे. तेथील परिस्थितीची माहिती घेतली. राज्य सरकार उत्तराखंड सरकारच्या संपर्कात असून मुख्यमंत्री पुष्कर धामी यांच्याशी माझे फोनवरुन बोलणे झाले आहे. तेथे मदतकार्य सुरू आहे नागरिकांना ऋषिकेश येथे सुरक्षित हलविले जाणार आहे. 
 

Related Articles