डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण   

मनीषा मुसळे-मानेला अखेर जामीन

सोलापूर, (प्रतिनिधी) : सोलापुरातील प्रसिद्ध मेंदू विकारतज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपी मनीषा मुसळे-मानेला अखेर जामीन मंजूर झाला. तपास पूर्ण झाल्याने मनीषाला जामीन देण्याची मागणी तिच्या वकिलांनी केली होती. न्यायालयाने ती मान्य करीत जामीन मंजूर केला. त्यामुळे तब्बल ६७ दिवसानंतर मनीषाची कारागृहातून सुटका होणार आहे.
 
मनीषाच्या जामीन अर्जावर २३ जून रोजी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश जयदिप मोहिते यांच्यासमोर युक्तिवाद झाला होता. ज्या ई-मेलमुळे डॉ. शिरीष वळसंगकर यांनी आत्महत्या केल्याचा आरोप आहे. त्या ई-मेलमध्ये डॉक्टरांवर चारित्र्याचे अथवा इतर कोणतेही आरोप नव्हते. मनीषाने राजीनामा दिला होता, त्यामुळे तो विषय तिथेच संपला होता. प्रकरणातील सुसाईड नोट ही दुसर्‍या दिवशी जप्त केल्याचे दाखवण्यात आली. वास्तविकता मयताच्या अंगावरील कपडे त्याच दिवशी ताब्यात घेतले होते. त्यामुळे सुसाईड नोट दुसर्‍या दिवशी सापडली, ही बाब संशयास्पद दिसते. सुसाईड नोटमधील हस्ताक्षर मराठीत असून दोषारोप पत्रातील कागदपत्राप्रमाणे २००१ नंतर डॉक्टरांनी मराठीत लिखाण केले नव्हते. यावरून सुसाईड नोट ही बनावट असल्याची शक्यता नाकारता येत नाही. अपहाराबाबतचे आरोप हे जुलै २०२४ पूर्वीचे असून, त्याचा डॉक्टरांच्या आत्महत्येशी संबंध दिसून येत नाही. दोषारोप पत्रातील एकूण ४४ साक्षीदार हे दवाखान्यातील कर्मचारी आहेत.  
 
सरकारी वकील अ‍ॅड. प्रदिपसिंह रजपूत यांनी जामिनावर हरकत घेतली. डॉक्टरांनी लिहलेली चिठ्ठी आणि आत्महत्येपूर्वी मुलाला केलेला फोन मृत्युपूर्व जबाब म्हणून ग्राह्य धरला जावा. मनीषाच्या भ्रष्टाचारामुळे आणि दिलेल्या धमकीमुळे डॉ. शिरीष यांनी आत्महत्या केली. 
 
मनीषा यांना जामीन दिल्यास त्याचा परिणाम इतर हॉस्पिटल आणि इन्स्टिट्युटशन यांना होऊ शकतो त्यामुळे जामीन देऊ नये अशी विनंती अ‍ॅड. प्रदीपसिंह रजपूत यांनी केली होती. दोन्हीकडील युक्तिवाद ऐकून अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश जयदिप मोहिते यांनी मनीषाला जामीन मंजूर केला. यात मनीषाच्यावतीने अ‍ॅड. प्रशांत नवगिरे, अ‍ॅड. श्रीपाद देशक, अ‍ॅड. सिद्धाराम पाटील तर सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. प्रदीपसिंह रजपूत यांनी काम पाहिले.
 
घटनाक्रम 
 
१८ एप्रिल डॉ. शिरीष वळसंगकर यांची आत्महत्या, १९ एप्रिल अंतिम संस्कार, त्यानंतर मुलगा डॉ. आश्विन याने रात्री उशिरा पोलिसांकडे दिली फिर्याद. मनीषा मुसळे-मानेला अटक,२० एप्रिल मनीषाला कोर्टाकडून तीन दिवसांची पोलीस कोठडी, २३ एप्रिल मनीषाला २ दिवसांची वाढीव पोलीस कोठडी, २५ एप्रिल मनीषाला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी,१३ मे न्यायालयीन कोठडीनंतर पुन्हा दोन दिवसांची पोलीस कोठडी,१५ मे मनीषाला १४ दिवसांची पुन्हा न्यायालयीन कोठडी,१७ जून मनीषा विरोधात ७२० पानांचे दोषारोप पत्र दाखल,२३ जून मनीषाच्या जामिनावर दोन्ही बाजूंकडून युक्तिवाद आणि २५ जून मनीषाला जामीन मंजूर झाला. 
 
कुणालातरी वाचविण्यासाठी मनीषा मुसळे-माने यांना बळीचा बकरा बनविण्यात येत असल्याचे आम्ही न्यायालयासमोर मांडले. दोषारोप पत्रातील संशायस्पद गोष्टीही न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या. त्यामुळे न्यायालयाने मनीषाला जामीन मंजूर केला. याची अधिकृत प्रत गुरूवारी मिळणार आहे.
 
- अ‍ॅड. प्रशांत नवगिरे, मनीषाचे वकील 

Related Articles