हिंदीसक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र   

५ जुलै रोजी संयुक्त मोर्चा 

मुंबई, (प्रतिनिधी) : शालेय अभ्यासक्रमात पहिलीपासून हिंदीचा समावेश करण्याच्या सरकारच्या निर्णयाविरुद्ध आक्रमक भूमिका घेणारे ठाकरे बंधू ५ जुलै रोजी मोर्चात एकत्र येणार आहेत. पक्षांचा झेंडा बाजूला ठेवून केवळ मराठीच्या अजेंड्यासाठी एकत्र येण्याच्या राज ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत उद्धव ठाकरे यांनी ५ जुलैच्या आंदोलनात सहभागी होण्याचे मान्य केले आहे. 
 
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ५ जुलै रोजी हिंदीसक्तीविरोधात दोन्ही पक्षाचा एकच मोर्चा निघणार असल्याची अधिकृत घोषणा पत्रकार परिषद घेऊन केली. तर मनसे नेते संदीप देशपांडे आणि ठाकरे सेनेचे आमदार वरुण सरदेसाई यांची एका हॉटेलात बैठक होऊन त्यात मोर्चाच्या नियोजनाबाबत चर्चा झाली. राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर राजकीय व्यासपीठावर प्रथमच दोन ठाकरे एकत्र येणार असून, महाराष्ट्राच्या आगामी राजकारणाच्या दृष्टिकोनातून ही मोठी घडामोड असणार आहे.
 
राऊत यांनी काल सकाळी पत्रकार परिषद घेऊन याची घोषणा केली. राज ठाकरे यांनी आपल्याशी संपर्क करून, हिंदी सक्ती विरोधात, मराठी भाषेसाठी एकत्र आले पाहिजे, दोन मोर्चे निघणे हे योग्य वाटत नाही, असे त्यांनी सांगितले. त्यांची ही भूमिका मी उद्धव ठाकरे यांना कळवली. त्याला उद्धव ठाकरे यांनीही लगेचच सकारात्मक प्रतिसाद दिला.  त्यानंतर मी राज ठाकरे यांच्याशी बोललो. त्यांनी देखील ते तत्काळ मान्य केले, असे राऊत यांनी सांगितले. 
 
दरम्यान, मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेऊन हिंदी सक्तीविरोधात मनसे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष एकत्र येणार असून हा राजकीय मोर्चा नसून याचे नेतृत्व मराठी माणूसच करणार असल्याचे सांगितले. 

काँग्रेस आणि राष्ट्रवादीही सहभागी होणार 

हिंदी सक्तीविरोधातील मोर्चामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसदेखील (शरद पवार गट) सहभागी होणार आहे. मनसे आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून हिंदी सक्तीविरोधात मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चात काँग्रेस सहभागी होणार असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी शुक्रवारी जाहीर केले. काँग्रेसने मराठी सन्मान मोर्चात सहभागी व्हावे, यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावतीने बाळा नांदगावकर यांनी काँग्रेसचे नेते विजय वड्डेटीवार यांना संपर्क केला होता. तर, उद्धव ठाकरे गटाकडून  संजय राऊत यांनी सकपाळ यांच्याशी चर्चा करून मोर्चात सहभागी होण्याचे निमंत्रण दिले होते. प्रत्येक मराठी माणसाने या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे. 
 

Related Articles