थायलंडच्या पंतप्रधान शिनावात्रा निलंबित   

बँकॉक : थायलंडच्या पंतप्रधान पेतोंगटार्न शिनावात्रा यांना पदावरुन निलंबित करत असल्याचा आदेश घटनात्मक पीठाने मंगळवारी दिला. सीमेवरील तणावावेळी त्यांनी कंबोडियाच्या प्रमुखांशी दूरध्वनी वरून केलेले संभाषण जगजाहीर झाले होते. या संदर्भात चौकशी सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर शिनावात्रा यांना निलंबित करण्याचा आदेश न्यायालयाने दिला.
 
पंतप्रधान पदावर असताना नीतिमत्तेचे पालन केले नाही. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी अर्जाद्वारे केली होती. त्या संदर्भातील निकाल सात विरुद्ध दोन मतांनी काल न्यायाधीशांनी दिला. त्यामुळे त्यांना पदावरून निलंबित करत असल्याचे जाहीर केले. शिनावात्रा यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. राष्ट्रीय भ्रष्टाचारविरोधी आयोग त्यांची नीतिमत्तेच्या विषयावरुन  चौकशी करत आहे. ते सुद्धा शिनावात्रा यांना पदावरून हटविण्याचे एक कारण असल्याचे सांगितले जात आहे. 
 
थायलंड आणि कंबोडिया यांच्यात सीमेवरून २८ मे रोजी सैन्य संघर्ष उफाळून आला होता. त्यात कंबोडियाचा एक सैनिक ठार झाला होता. यानंतर  तणाव कमी करण्यासाठी शिनावात्रा यांनी कंबोडियाच्या प्रमुखांशी राजनैतिक तोडगा काढण्यासाठी दूरध्वनीवरून संपर्क साधला होता. ही बाब जगजाहीर होताच थायलंडमध्ये संतापाची लाट उसळली होती. नागरिकांनी निदर्शने केली होती. या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर शिनावात्रा यांच्याविरोधात अर्ज दाखल केला होता त्याची अंतिम सुनावणी काल झाली. न्यायालयाने त्यांना पदावरून निलंबित करत असल्याचे जाहीर केले. न्यायालयाचा निकाल शिनावात्रा यांनी स्वीकारला आहे.  कामकाजात हस्तक्षेप करणार नसल्याचे सांगितले. 
 
दरम्यान, राजे  महा वजिरा लोंगकोर्न यांनी मंत्रिमंडळात फेरबदल करण्याचे आदेश काढले आहेत. यानंतर प्रमुख घटक पक्षांनी शिनावात्रा यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. 
 

Related Articles