पाकिस्तानात पावसाचे ३८ बळी   

इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये पावसाशी संबंधित घटनांमध्ये मृतांची संख्या ३८ वर पोहोचली आहे, तर ६३ जण जखमी झाले आहेत, अधिकार्‍यांनी ही माहिती दिली.अधिकार्‍यांनी सांगितले, की देशाच्या विविध भागात मान्सूनपूर्व पावसाचा कहर सुरूच आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (एनडीएमए)  सांगितले, की २६ जूनपासून पाऊस सुरू झाला तो विविध भागांत अधूनमधून सुरूच आहे. वायव्येकडील खैबर-पख्तूनख्वा प्रांताला या पावसाचा सर्वाधिक फटका बसला, असे प्राधिकरणाने म्हटले आहे. खैबर-पख्तूनख्वामधील स्वात भागात आलेल्या पुरात एकाच कुटुंबातील १९ जणांचा मृत्यू झाला.

पुरात कुटुंब वाहून गेले

पुराच्या पाण्याने वेढलेल्या कुटुंबाला मदत करण्यात अपयशी ठरल्याबद्दल पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाने सरकारवर टीका केली आहे. पुराच्या पाण्याने वेढलेले कुटुंब एका तासासाठी उंच जमिनीवर आश्रय घेत होते, परंतु अखेर ते वाहून गेले, असे अधिकार्‍यांनी सांगितले. कुटुंबाला वाचवण्यात अपयशी ठरल्याबद्दल प्रांतीय सरकारने चार अधिकार्‍यांना निलंबित केले आणि स्वातचे उपायुक्त शहजाद मेहबूब यांना त्यांच्या पदावरून काढून टाकले. केंद्रीय माहिती मंत्री अत्ता तरार यांनी शनिवारी मुख्यमंत्री अली अमीन गंडापूर यांनी मृत्यूची जबाबदारी स्वीकारून राजीनामा देण्याची मागणी केली.
 
पावसाशी संबंधित घटनांमध्ये पंजाबमध्ये बारा आणि सिंध प्रांतात सात जणांचा मृत्यू झाला. वेगवेगळ्या घटनांमध्ये, पंजाबमध्ये ४१, सिंधमध्ये १६ आणि खैबर-पख्तूनख्वामध्ये सहा जण जखमी झाले, असे अधिकार्‍यांनी सांगितले. संपूर्ण पाकिस्तानात एकूण ६३ घरांचे नुकसान झाले आणि ३० जनावरे मृत्युमुखी पडली. अधिकार्‍यांच्या मते, पाऊस आणि पुरामुळे रस्ते आणि पुलांचेही नुकसान झाले आहे. 

Related Articles