दिल्लीत इमारतीला आग; चौघांचा मृत्यू   

रोहिणी परिसरातील दुर्घटना 

नवी दिल्ली : येथील रोहिणी विभाग परिसरातील एका पाच मजली व्यावसायिक इमारतीला मंगळवारी मध्यरात्री भीषण आग लागली. त्यात चौघांचा होरपळून मृत्यू झाला असून तीन जखमी झाले आहेत.रोहिणी परिसरातील रिथाला येथील इमारतीला मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजता आग लागली होती .रिथाला मेट्रो स्थानकाजवळ इमारत असून तेथे विविध उत्पादने तयार केली जातात. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. सुमारे १६ गाड्या आग नियंत्रणात आणण्यासाठी पाठवल्या होत्या. आगीचे कारण अस्पष्ट आहे. शोध मोहीम वेगाने सुरू आहे. कोणी तेथे अडकले आहे का ? याचा शोध घेतला जात आहे. 

घटनास्थळी चार जळालेले मृतदेह सापडले.

तीन जखमींची ओळख पटली आहे. एक नागरिक किरकोळ जखमी झाला. त्यांच्यावर बीएसए रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यापैकी दोघांना नंतर आरएमएल रुग्णालयात अधिक उपचारासाठी हलविले आहे. दरम्यान, मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास तीन मृतदेहानंतर आणखी एक मृतदेह सापडला होता. त्यामुळे मृतांची संख्या चार झाली. सकाळी ६ वाजता तळमजल्यावर आग नियंत्रणात आणली. तिसर्‍या व  वरील मजल्यावरची आग नियंत्रणात आणण्याचे काम सुरू होते. धुरामुळे मदत कार्यात अडथळे येत आहेत. 
 
अतिरिक्त विभागीय अधिकारी राजेश कुमार यांनी सांगितले की, आग नियंत्रणात आणणे आणि परिसर थंड करण्याचे काम सुरूच आहे. इमारतीत अग्निरोधक यंत्रणा तसेच नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची आपत्कालीन व्यवस्था नव्हती. तळमजल्यावर छपाईसाठी आवश्यक असलेले रसायन ठेवले होते. त्यामुळे आग लागून त्याचा भडका उडाल्याचे प्रथमदर्शनी दिसते. मात्र, आगीचे नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 

Related Articles