उत्तराखंडमध्ये महाबळेश्‍वरमधील सहा पर्यटक सुरक्षित   

आकाश जाधव यांच्याशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साधला संवाद

सातारा, (वार्ताहर) : उत्तराखंड जिल्हा उत्तरकाशी येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील पर्यटक अडकले आहेत. यामध्ये महाबळेश्‍वरमधील सहा पर्यटकांचा समावेश आहे. हे सर्व पर्यटक सुरक्षित आहेत. या अडकलेल्या पर्यटकांमध्ये महाबळेश्‍वरचे पर्यटक आकाश जाधव यांच्याशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संवाद साधून त्यांना धीर दिला.उत्तराखंड जिल्हा उत्तरकाशी येथे 30 जून रोजी सिलाईबंद या ठिकाणी अतिवृष्टिमुळे चारधाम रस्ता वाहून गेला. यामुळे राज्यातील सर्वसाधारणपणे 150 पर्यटक अडकले आहेत. झांझवड (ता. महाबळेश्‍वर) येथील सहा पर्यटकांचा यामध्ये समावेश असून ते सध्या बडकोट येथे सुखरुप असल्याची माहिती घेतली.
 
झांजवड गावातील सेवानिवृत्त शिक्षक संभाजी जाधव, आकाश जाधव, आशिष जाधव, नीलम जाधव, कल्पना जाधव व नियती जाधव असे कुटुंबातील एकूण सहाजण उत्तराखंडमधील सुरू असलेल्या ढगफुटीमध्ये अडकले आहेत. हे कुटुंब महाबळेश्वर येथून 28 जून रोजी रेल्वे व खासगी वाहनाद्वारे रवाना झाले होते. सातार्‍यातून डेहराडून येथे गेले. तेथून गंगोत्रीला जायचे त्यांचे नियोजन होते. मात्र, अचानक ढगफुटीने हाहाकार उडवला. थरकाप उडवणारा पाऊस सुरू झाला. या पावसाचा जोर वाढतच गेला. त्यामध्ये प्रचंड हानी झाली. रस्ते वाहून गेले. त्यामुळे या कुटुंबासह अनेक पर्यटक यमुनोत्री येथे अडकून पडले. त्या ठिकाणाहून तेथील स्थानिक प्रशासनाने त्यांना मदतीचा हात दिला.
 
त्यांना जानकी चट्टी ते राणा चट्टी यादरम्यान अडकलेल्या पर्यटकांना कारने घेऊन जाण्यात आले. तेथून त्यांना सुमारे सहा किलोमीटर चालत एका डोंगरापर्यंत जावे लागले. तेथून त्यांना स्थानिक प्रशासनाने बरकोट या जिल्ह्याच्या ठिकाणी वाहनातून सुखरूप हलवण्यात आल्याची माहिती अडकलेले पर्यटक आकाश जाधव यांनी दिली.यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी झांझवड येथील पर्यटक आकाश जाधव यांच्याशीही भ्रमणध्वनीवरून संवाद साधला. तेथील परिस्थिती बद्दल माहिती घेतली. प्रशासनाने केलेल्या मदतीबद्दल जाणून घेतले. काही अडचण असल्यास त्वरित संपर्क साधण्याबाबत सांगितले. 
 

Related Articles