गर्दीच्या काळातही प्रवाशांना मिळणार रेल्वे तिकीट   

मध्यस्थांना बसणार आळा 

पुणे : पूर्वी आगाऊ तिकीट आरक्षण खुले झाले की काही वेळातच संपूर्ण तिकिटे आरक्षित होत. त्यातील बहुतांश तिकिटे मध्यस्थ (एजंट) आरक्षित करून ठेवत होते. त्यामुळे बर्‍याच वेळा प्रवाशांना अडचणी येत होत्या. मात्र आता केवळ आधार ओटीपी ऑथेंटिकेशनद्वारेच तत्काळ तिकिटे आरक्षित करता येत आहेत. ही प्रणाली 1 जुलैपासून लागू झाली आहे. त्यामुळे मध्यस्थांना आळा बसला आहे. 
 
रेल्वे प्रशासनाने ही प्रणाली 1 जुलैपासून लागू केली आहे. या प्रणालीमुळे तत्काळ तिकिट आरक्षणात अधिक पारदर्शकता आली आहे. गरजू प्रवाशांना प्राधान्य देणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. या बदलामुळे तिकीट आरक्षण खिडकी उघडल्यानंतर पहिल्या 30 मिनिटांपर्यंत मध्यस्थ तत्काळ तिकिटे आरक्षित करू शकणार नाहीत. याचा फायदा सामान्य प्रवाशांना होत आहे. त्यामुळे या नव्या प्रणालीचे प्रवासी स्वागत करत आहेत. 
 
या नव्या प्रणालीमुळे 30 मिनिटांनंतर जी तत्काळ तिकिटे उपलब्ध असतील तीच मध्यस्थांना मिळत आहेत. मध्यस्थ तिकीट आरक्षणाला देखील ओटीपी आधारित आधार पडताळणी अनिवार्य करण्यात आली आहे. तसेच जे प्रवाशी खिडकी किंवा मध्यस्थाद्वारे तिकिटे आरक्षित करतील त्यांना देखील 15 जुलैपासून आधार ओटीपी अनिवार्य असणार आहे. मध्यस्थांच्या बदललेल्या वेळेमुळे एसी क्लासची तिकीटे सामान्य प्रवासी सकाळी 10 वाजेपासून, मध्यस्थ 10:30 नंतर आरक्षित करू शकणार आहेत. तर नॉन-एसी क्लासची तिकिटे सामान्य प्रवासी सकाळी 11 वाजल्या पासून आणि मध्यस्थ 11:30 नंतर तिकीट आरक्षित करू शकणार आहेत.
 
गणपती, दिवाळीत मिळणार तिकिटे
 
तात्काळ तिकिटाच्या नव्या प्रणालीमुळे गणेशोत्सव, दसरा, नवरात्रोत्सव आणि दिवाळी सारख्या गर्दीच्या काळातही प्रवाशांना रेल्वेची तिकिटे उपलब्ध होणार आहेत. तात्काळ तिकीट आरक्षणाला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या अर्धा तासात केवळ प्रवाशांनाच तिकिटे आरक्षित करता येणार आहेत. त्यानंतर मध्यस्थांना तिकीट आरक्षित करता येणार आहे. या नव्या प्रणालीचा प्रवाशांना फायदा होत आहे. प्रवाशांना गर्दीच्या काळातही तिकीट उपलब्ध होणार आहेत. 

Related Articles