‘हिंदी’ विरोधात राज आणि उद्धव यांचे स्वतंत्र आंदोलन   

मुंबई, (प्रतिनिधी) : राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार त्रिभाषा सूत्र लागू करण्याचा व पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून हिंदीचा पर्याय ठेवण्याच्या निर्णयाविरुद्ध राज्यभर वातावरण तापले आहे. मनसे  अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदीसक्तीविरोधात ५ जुलै रोजी मोर्चा काढण्याची गुरुवारी घोषणा केली. दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांनीही हिंदी सक्ती विरोधात येत्या रविवारी (२९ जून) आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी राज ठाकरे यांची भेट घेत मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. पण, राज यांनी त्यांची विनंती फेटाळून लावली.
 
पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्याची सरकारची भूमिका असून, याविरुद्ध मनसेसह सर्वच विरोधी पक्षांनी दंड थोपटले आहेत. शिक्षणमंत्री भुसे यांनी राज यांची भेट घेऊन सरकारची भूमिका सांगितली. परंतु, राज यांनी त्यांची विनंती अमान्य करत आंदोलनाची घोषणा पत्रकार परिषदेत केली. राज्याचे शिक्षण मंत्री आता येऊन गेले त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. मी पूर्णपणे भूमिका फेटाळून लावली असून आम्हाला हे मान्य नसल्याचे सांगितले. भुसे यांनी माझ्याशी चर्चा केली. पण, काही प्रश्नांची उत्तरे त्यांच्याकडे नव्हती. हा एक कट आहे. हिंदी किंवा इतर कोणत्याही भाषेची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नसल्याचे सांगताना राज म्हणाले, मी हिंदी सक्तीचा विरोध करण्यासाठी  ५ जुलै रोजी गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान असा मोर्चा काढणार आहे. या मोर्चात कोणत्याही पक्षाचा झेंडा नसेल. तो मोर्चा मराठी माणसाचा असेल, मोर्चाचे नेतृत्व मराठी माणूसच करेल, असेही राज ठाकरे म्हणाले.
 

Related Articles