एसआयटीमार्फत होणार तपास   

कोलकाता अत्याचार प्रकरण; पाच जणांची समिती

कोलकाता : विधी महाविद्यालयातील सामूहिक अत्याचार प्रकरणाच्या चौकशीसाठी कोलकाता पोलिसांनी शनिवारी पाच सदस्यांचे विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले, असे एका अधिकार्‍याने शनिवारी सांगितले. सहाय्यक पोलिस आयुक्त प्रदीप घोषाल यांच्या नेतृत्वाखाली ही समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती तातडीने तपास सुरू करेल, असेही ते म्हणाले.
 
दरम्यान, या प्रकरणात विधी महाविद्यालयाच्या सुरक्षा रक्षकास अटक करण्यात आली आहे. त्यामुळे, या प्रकरणातील अटकेतील आरोपींची संख्या चार वर पोहोचली आहे. पिनाकी बॅनर्जी असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी चौकशीसाठी त्याला बोलावले होते. मात्र, तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. शवाय, महाविद्यालय परिसरातील सीसीटीव्हीमध्ये सुरक्षा रक्षक घटनास्थळीच आढळला होता. दरम्यान, सुरक्षा रक्षकाने आरोपींना कृत्य करण्यापासून रोखले नाही. शिवाय, तो का आणि कोणाच्या सांगण्यावरुन खोलीतून बाहेर पडला? हे आम्ही जाणून घेत आहोत. एक प्रकारे या कृत्यास त्याचा पाठिंबा होता, असेही अधिकार्‍याने सांगितले. 
 
पीडितेनेदेखील तक्रारीमध्ये सुरक्षा रक्षकाने तिला मदत केली नाही, असे म्हटले आहे. पीडिता महाविद्यालयात फॉर्म भरण्यासाठी गेली होती. सायंकाळी साडेसात ते रात्री साडेदहा यावेळेत हे कृत्य घडले. मोनोजित मिश्रा (३१), जैब अहमद (१९) प्रमित मुखर्जी (२०) या तिघांना आधीच अटक झाली आहे. मिश्रा हा मुख्य आरोपी असून तो महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आहे. शिवाय, तो हंगामी स्वरुपात शिक्षकेतर कर्मचारी म्हणून महाविद्यालयात काम करत होता. त्याचे सत्ताधारी तृणमूल काँग्रेसमधील नेत्यांशी निकटचे संबंध असल्याचे समोर आले आहे.
 
मुख्य सचिवांना पत्र
 
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी पश्चिम बंगालच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिले आहे. तसेच, या प्रकरणात तातडीने कारवाई करण्यास सांगितले आहे. यासोबतच, पीडिता आणि तिच्या कुटुंबीयांना पोलिसांना सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. पीडितेची त्वरित वैद्यकीय तपासणी करावी. तसेच, वैद्यकीय अहवाल तीन दिवसांत राष्ट्रीय महिला आयोगापुढे सादर करावा, असेही म्हटले आहे. यासोबतच, पीडिता आणि तिच्या कुटुंबीयांची सुरक्षा निश्चित करावी, असे आवाहनदेखील त्यांनी केले.
 
लग्नाचा प्रस्ताव नाकारल्यामुळे कृत्य
 
मुख्य आरोपी मोनोजित मिश्रा याचा लग्नाचा प्रस्ताव नाकारल्यामुळे पीडितेवर सामूहिक अत्याचार करण्यात आला, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. हे कृत्य पूर्वनियोजित होते की कसे? याचा शोध सुरू आहे, असेही ते म्हणाले. घटनाक्रम पाहता लग्नाचा प्रस्ताव नाकारल्यानंतर मुख्य आरोपीने सूडापोटी हे कृत्य केले. परिस्थितीजन्य पुराव्यांद्वारे हे सिद्ध झाले आहे, असेही ते म्हणाले. पण, हा पूर्वनियोजित गुन्हा होता की अचानक घडला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, असेही त्यांनी सांगितले. आरोपींनी कृत्याचे चित्रीकरण केले. तसेच, तिने याची कुठे वाच्यता केली तर चित्रीकरण समाज माध्यमावर प्रसारित करु, अशी धमकी दिली होती. पीडितेने घटनास्थळावरुन पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तिला हॉकी स्टिकने मारहाण करण्यात आली होती. घटनेच्या प्रत्येक पैलूची चौकशी केली जात आहे. आम्ही तिन्ही आरोपींचे आणि पीडितेचे कॉल डिटेल्स देखील तपासत आहोत, असेही पोलिसांनी सांगितले. वैद्यकीय तपासणीत पीडितेवर सामूहिक बलात्कार झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. पीडितेच्या मानेवर आणि शरीरावर मारहाणीच्या खुणा आहेत. शिवाय, काही ठिकाणी जखमा आहेत. 

Related Articles