रशियाचे नेते, अधिकार्‍यांना दोषी ठरविण्यासाठी न्यायालय   

युक्रेनचे अध्यक्ष झेलन्स्की यांची कागदपत्रांवर स्वाक्षरी

किव्ह : युक्रेन युद्धासाठी रशियाचे नेते आणि ज्येष्ठ अधिकारी जबाबदार आहेत. रशियन सैन्याने अनेक युद्ध अपराध केले आहेत. त्यामुळे  त्यांना दोषी ठरविण्यासाठी नवे आंतरराष्ट्रीय न्यायालय स्थापन करण्याचा निर्णय युक्रेन आणि युरोपीय महासंघाने घेतला आहे. त्या संदर्भातील कागदपत्रांवर युक्रेनचे अध्यक्ष झेलन्स्की यांनी स्वाक्षरी केली. त्यामुळे रशियासह अध्यक्ष पुतीन यांच्या अडचणीत अधिक वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 
 
रशिया आणि युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर युरोपीय महासंघ आणि युक्रेन यांच्याकडून संयुक्तपणे नवे न्यायालय (विशेष लवाद) तयार केले जात आहे. त्यात मानवी हक्क संघटनेचे सदस्य आहेत. त्याद्वारे रशियाच्या नेते आणि ज्येष्ठ अधिकार्‍यांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्यात येणार आहे. युक्रेनविरोधात युद्ध पुकारल्याप्रकरणी त्यांना दोषी ठरविण्यात येणार आहे. पर्यायाने त्यांच्यामुळे २०२२ मध्ये युद्धास प्रारंभ झाला असून ते अजूनही सुरू असल्याचे म्हटले आहे. 
 
रशिया आणि युक्रेन यांच्यात तीन वर्षांपासून भीषण युद्ध सुरू आहे. त्या युद्धाला सर्वस्वी रशिया जबाबदार असल्याचा आरोप युक्रेनचा आहे. युद्धाला जबाबदार असलेल्या रशियाचे वरिष्ठ अधिकारी यांना दोषी ठरवून शिक्षा दिली पाहिजे, अशी झेलन्स्की यांची मागणी आहे.
 
जागतिक पातळीवरील दोन देशांतील संघर्ष आणि अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे. त्यामध्ये हेग येथील आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयाचा समावेश आहे. पण तेथे रशियन अधिकारी आणि नेत्यांना दोषी ठरविण्याची शक्यता कमी आहे, असे झेलन्स्की यांना वाटते. त्यामुळे आता विशेष लवादाच्या माध्यमातून नवे आंतरराष्ट्रीय न्यायालय तयार करण्याचा घाट घातला गेला. युरोपीय महासंघाने त्याला पाठिंबा दिला आहे. रशियन सैन्याने अनेक युद्ध गुन्हे केले आहेत. त्यात नागरिकांवर, पायाभूत सुविधांवर बाँबफेक, निष्पाप नागरिकांची हत्या, बलात्कार, नागरिकांना ओलिस ठेवणे आणि छळ यांचा समावेश आहे. मात्र, या बाबी रशियाने फेटाळल्या आहेत. त्यामुळे नवा लवाद स्थापन करून दोषींवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. 

अटक वॉरंटचे काय झाले ? 

रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांना हेग येथील आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयाने युद्ध गुन्हेगार घोषित केले आहे. त्यांच्याविरोधात अटक वॉरंटही बजावले आहे. पण, त्यांच्यावर गेल्या तीन वर्षांत कोणतीच कारवाई कधीच  झालेली नाही. युद्धात गुंतल्यामुळे आणि वॉरंटमुळे ते परदेश दौरे देखील टाळत आले आहेत. 
 

Related Articles