’वन बिग ब्यूटीफुल बिल’ व्हान्स यांच्या मताने तरले   

कर सवलती आणि खर्चात कपातीस मंजुरी

वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ’वन बिग ब्यूटीफुल बिल’ सिनेटने अल्पमतांनी मंजूर केले. हे विधेयक मंजूर करण्यात उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ट्रम्प यांच्या महत्त्वाकांक्षी कर सवलती आणि खर्चात कपात करण्याचे विधेयक असून विधेयकाच्या बाजूने आणि विरोधात प्रत्येकी 50 मते पडली. व्हान्सने मत दिल्यानंतर ते मंजूर झाले.
 
नेते जॉन थुन यांनी डेमोक्रॅट्सकडे झुकलेल्या दोन उदारमतवादी सदस्यांना आपल्या बाजूने खेचण्यात यश मिळविले. त्यामुळे मतांमध्ये स्पर्धा निर्माण झाली. ट्रम्प यांनी अमेरिकन काँग्रेसला हे विधेयक मंजूर करण्यासाठी 4 जुलैची अंतिम मुदत दिली आहे. लष्करी खर्चात 150 अब्ज डॉलर्सची वाढ आणि परदेशी नागरिकांच्या सामूहिक हकालपट्टीसाठी विशेष तरतूद केली आहे. ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळातील 4.5 ट्रिलियन डॉलर्सच्या कर कपातीचा विस्तार करणारे हे विधेयक ठरले आहे..

विमाधारक चिंतेत

वैद्यकीय आरोग्य विमा कार्यक्रमात 1.2 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत कपात करण्याचा प्रस्ताव विधेयकात आहे. यामुळे अंदाजे 8.6 दशलक्ष कमी उत्पन्न असलेले आणि दिव्यांग व्यक्‍ती आरोग्य विमा कवच गमावू शकतात.  अब्जावधी डॉलर्सचे हरित ऊर्जा कर क्रेडिट्स काढून टाकले जात आहेत. त्यामुळेे ईव्ही कर क्रेडिट मागे घेतले जाणार असल्याने पर्यावरण प्रेमींनी चिंता व्यक्‍त केली.

रिपब्लिकन सदस्यांचा विरोध

मंगळवारी रात्री हे विधेयक मंजूर करण्यात आले. त्यासाठीच्या तरतुदींना डेमोक्रॅट्सकडूनच नव्हे तर रिपब्लिकन पक्षाकडूनही विरोध झाला होता. त्यामध्येे रिपब्लिकन सदस्य आणि उत्तर कॅरोलिनाचे सिनेटर थॉम टिलिस, मेनचे सुसान कॉलिन्स आणि केंटकीचे रँड पॉल यांचा समावेश होता. 

ट्रम्प नवा पक्ष काढतील : मस्क

अब्जाधीश उद्योगपती अ‍ॅलन मस्क यांनी विधेयकाला तीव्र विरोध केला आहे. त्याबाबतची पोस्ट त्यांनी टाकली. जर ’वन बिग ब्यूटीफुल बिल’ मंजूर झाले तर ट्रम्प एक नवीन पक्षाला जन्म घालणार आहेत. आता हे विधेयक प्रतिनिधी सभागृहात परत जाईल, जिथे त्याला डेमोक्रॅट्स तसेच आरोग्य सेवा आणि अन्न साहाय्य कार्यक्रमांमध्ये कपात करण्याच्या कल्पनेला विरोध करणारे रिपब्लिकन यांच्याकडून देखील अडथळा येऊ शकतो, अशी शक्यता वर्तविली जात आहे. 
 

Related Articles