सोमेश्वरनगरीत नेत्रदीपक रिंगण सोहळा   

गणेश आळंदीकर

सोमेश्वरनगर : होय होय ते वारकरी पाहे पाहे ते पंढरी... या उक्तीची प्रचिती देत हरिपाठाचा गजर करीत पंढरीच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी आतुर झालेला संत सोपानकाकांचा पालखी सोहळ्यातील वैष्णवांचा मेळा गुरुवारी सोमेश्वरनगरीत पहिले नेत्रदीपक रिंगणसोहळा पार पाडून विसावला.
 
निंबूत येथील मुक्काम आटोपून संत सोपानकाका पालखी सोहळ्याने सकाळी सोमेश्वरकडे प्रस्थान ठेवले. सकाळी दहा वाजता सोहळा निंबूत छपरी येथे सकाळच्या न्याहारीसाठी पोहोचला. याठिकाणी ग्रामस्थांनी पालखीचे स्वागत केले. वाघळवाडी येथे पालखी अंबामाता मंदिर या ठिकाणी विसाव्यासाठी ठेवण्यात आली. ज्ञानोबा-तुकोबांचा जयघोष करीत गावकर्‍यांनी रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी काढून, नीरा-बारामती रस्त्यावर स्वागत कमानी उभारल्या होत्या. सरपंच हेमंत गायकवाड, उपसरपंच तुषार संकुडे,  गणेश जाधव, अविनाश सावंत, अजिंक्य सावंत, बबलू सकुंडे, ग्रामविकास अधिकारी संजयकुमार भोसले उपस्थित होते. 
 
वाघळवाडीकरांच्या पिठले भाकरी सह जेवणाचा आस्वाद घेऊन दुपारी चार वाजता पालखी रिंगणासाठी मु.सा. काकडे महाविद्यालयात आली. पहिले अश्व रिंगण पाहण्यासाठी हजारो वारकर्‍यांनी आणि सोमेश्वर परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. अश्वाने रिंगण पूर्ण करताच भक्तिमय वातावरणात विठुनामाचा गजर करण्यात आला. प्रथम सोपानकाकांच्या पादुकांचे रिंगण पूर्ण झाले. त्यानंतर मानाच्या अश्वाने दोनवेळा रिंगण पूर्ण करीत उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. गोल रिंगण पूर्ण होताच वीणेकरी तसेच तुळशीवृंदावन डोक्यावर घेऊन महिलांनी रिंगण पूर्ण केले. पालखी सोहळ्यात जवळपास दीड लाख वारकरी सहभागी झाले आहेत.   
 

Related Articles