पहिलीपासून हिंदी सक्तीचा निर्णय रद्द करण्यास भाग पाडू : सपकाळ   

मुंबई, (प्रतिनिधी) : पहिलीपासून हिंदी भाषा लादण्याचा राज्य सरकारचा निर्णय अत्यंत चुकीचा आहे. अशा प्रकारे लादले जाणारे अन्यायकारक भाषा धोरण खपवून घेतले जाणार नाही, असे ठणकावत हिंदी भाषेची सक्ती करण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू, असे  काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.
 
ज्येष्ठ मराठी अभ्यासक डॉ. दीपक पवार आणि मराठी अभ्यास केंद्रातील चिन्मयी सुमीत, राज असोंडकर, गिरीश सामंत, साधना गोरे व सुशील शेजुळे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची काल टिळक भवन येथे भेट घेऊन मराठी भाषा आणि शिक्षण धोरणासंदर्भात सविस्तर चर्चा केली.
 
यासंदर्भात बोलताना सपकाळ म्हणाले की, डॉ. दीपक पवार व त्यांच्या सहकार्‍यांची भूमिका आणि काँग्रेसची भूमिका एकच आहे. १६ एप्रिलच्या शासन निर्णयानंतर काँग्रेसने सर्वात आधी हिंदी सक्तीला विरोध केला होता. 
 
मुख्यमंत्री व शिक्षण मंत्री यांनी हा निर्णय रद्द करू, असे सांगितले होते. पण, त्यांनी शब्दछल करून पुन्हा त्याच आशयाचा शासन आदेश काढला. काँग्रेस पक्ष हा निर्णय मागे घेण्यास सरकारला भाग पाडेल. सरकारमधील दोन्ही घटक पक्षांनी ‘नरोवा कुंजरोवा’ची भूमिका घेतली असून त्यांची ही भूमिका मराठी माणसाच्या व मराठी भाषेच्या छातीत सुरा खुपसण्यासारखी आहे.
 

Related Articles