भगवान जगन्नाथ यात्रेला प्रारंभ   

लाखो भाविकांकडून दर्शन

जगन्नाथपुरी : ओडिशातील भगवान जगन्नाथ रथयात्रेला आज पासून प्रारंभ झाला असून यात्रेत सहभागी होण्यासाठी दर्शन घेण्यासाठी लाखोंच्या संख्येने भाविकांची  मंदिर परिसरात गर्दी केली. जगन्नाथ रथयात्रा (रथोत्सव) ही रथोत्सव किंवा श्री गुंडीचा यात्रा म्हणूनही ओळखली जाते. ढोल ताशांच्या वादन करुन शंख ध्वनीने यात्रेला उत्साहात प्रारंभ झाला आहे. 
 
पहांडी या धार्मिक विधीने काल यात्रेला विधिवत सुरूवात झाली असून यात्रा नऊ दिवस सुरू राहणार आहे. सकाळी साडेनऊ वाजता धार्मिक विधींना प्रारंभ होणार होता. परंतु एक तास उशीर झाला. भगवान जगन्नाथ, त्याचे मोठे बंधू बलभद्र आणि बहिण सुभद्रा यांच्या मूर्ती पारंपरिक रथात ठेवण्यात आल्या आहेत. मंदिराच्या सिंहद्वारातून तिन्ही रथ बाहेर पडले.  तिन्ही भावंडांनी आपआपल्या रथातून प्रवास सुरू केला असून अग्रभागी सुदर्शन यांचा रथ आहे. सोहळा पाहण्यासाठी देश आणि परदेशातील भक्तगण लाखोंच्या संख्येने मंदिर परिसरात आले. हे तिन्ही देव कालच १२ व्या शतकातील गुंडीचा मंदिराकडे रवाना झाले. शुक्ल पक्षाच्या दुसर्‍या दिवशी रथयात्रा सुरू होते. हा चांद्र महिन्याचा दुसरा दिवस असतो. चंद्राच्या वाढत्या कला आणि तेजाच्या काळात यात्रा आयोजित केल्यामुळे ती आध्यात्मिकदृष्ट्या शुभ मानली जाते. जगन्नाथ संस्कृतीचे प्रसिद्ध अभ्यासक सूर्यनारायण रथ शर्मा म्हणाले की, सोहळा सर्वात जुना रथोत्सव असून यात्रेवेळी भगवान जगन्नाथाचे दर्शन घेतल्याने भक्ताला मोक्ष मिळतो, असे मानले जाते.
 

रथांची नावे काय आहेत?

भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांच्या रथांची नावे अनुक्रमे नंदीघोष, तलध्वज आणि दर्पदलन अशी आहेत. गुंडीचा मंदिरापर्यंत भाविक त्यांचे रथ सुमारे तीन किलोमीटर पर्यंत खेचत नेत आहेत. पौराणिक कथेनुसार त्यांचे जन्मस्थान असल्याचे मानले जाते.

सुरक्षेत वाढ 

रथयात्रा सुरळीत आणि निर्विघ्न पार पडावी, यासाठी राज्य सरकारच्या विविध विभागांनी तयारी केली आहेे. जिल्हाधिकारी सिद्धार्थ शंकर स्वैन यांनी सांगितले की, आम्ही भव्य रथयात्रेसाठी तयारी केली असून यात्रेचे काळजीपूर्वक नियोजन केले आहे. 

पाच स्तरीय सुरक्षा कवच

नऊ दिवस चालणार्‍या रथयात्रा उत्सवासाठी शहराला पाच स्तरीय सुरक्षा कवच देण्यात आले आहे. रथयात्रेच्या दुतर्फा पोलिस दलाच्या २०० तुकड्या आणि सीमा सुरक्षा दल, केंद्रीय राखीव पोलिस दल इत्यादींच्या आठ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. रथ यात्रे दरम्यान पुरी आणि शहराभोवती ओडिशा पोलिस, केंद्रीय सशस्त्र पोलिस दल आणि गृहरक्षक दलाचे सुमारे दहा हजार कर्मचारी आहेत. 

सुरक्षेशी संबंधित ही नवीन प्रणाली

यंदा पहिल्यांदाच एकात्मिक कमांड-अँड-कंट्रोल सिस्टीम आणि इतर उप-नियंत्रण कक्षांमध्ये तैनात असलेले पोलिस अधिकारी उत्तर चौक ते पुरी शहरात कार्यरत असतील. संपूर्ण शहरात आणि पुरी ते कोणार्कपर्यंत त्यांचे लक्ष राहणार आहे. सुमारे २७५ एआय-सक्षम सीसीटीव्हींमधून वाहतूक आणि गर्दीच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. 

राष्ट्रपती, पंतप्रधानांच्या शुभेच्छा

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रथयात्रेनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. भगवान जगन्नाथ यांचे आशिर्वाद भाविकांना लाभोत तसेच जीवनात ऐश्यर्य आणि समृद्धीची द्वारे खुली व्हावीत, अशी अपेक्षा त्यांंनी  शुभेच्छा संदेशात व्यक्त केली. 

पश्चिम बंगालच्या दिघात पहिली जगन्नाथ यात्रा

ममतांसह मंत्रिमंडळातील सदस्य सहभागी 

कोलकाता : पश्चिम बंगालमधील दिघा येथे भगवान जगन्नाथ यांचे भव्य मंदिर उभारले आहे. तेथे शुक्रवारी पहिल्या रथयात्रेला सुरूवात झाली असून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या हस्ते रथयात्रेचे उद्घाटन झाले. 
 
जय जगन्नाथ या जयघोषात लाखो भाविकांच्या उपस्थितीत रथयात्रेला काल दुपारी प्रारंभ झाला. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यांनी भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभ्रदा यांच्या मूर्ती असलेल्या रथाचे दोर सुमारे ७५० मीटरपर्यंत ओढले. ममता यांनी भाविकांना बॅरिकेड्सबाहेरुन दोराला हात लावण्याचे आवाहन केले. तत्पूर्वी ममतांनी देवांसमोर साष्टांग दंडवत घातले आणि आरती देखील केली. तसेच रथासमोरील रस्ता देखील त्यांनी परंरपरेप्रमाणे सोन्याची दांडी असलेल्या झाडूने झाडला. तसेच इस्कॉनतर्फे आयोजित सांस्कृतिक कार्यक़्रमात भाग घेतला.रथयात्रेसाठी खास परदेशातून आलेल्या ४० भक्तांनी हरे रामा हरे कृष्णा या गीतावर रथासमोर नृत्य केले. 
 
 

Related Articles