संततधार पावसामुळे पेरण्या खोळंबल्या   

बेल्हे, (वार्ताहर) : गेल्या काही दिवसांपासून संततधार पडणार्‍या पावसामुळे जुन्नर तालुक्यात खरीप पिकांची शिल्लक पेरणीची व शेतीच्या आंतरमशागतीची कामे खोळंबली आहेत. जुन्नर तालुक्यात खरीप पिकाखाली 58 हजार 800 हेक्टर क्षेत्र असलेल्यापैकी 60 टक्के (सुमारे 36 हजार हेक्टर) क्षेत्रात खरीप पिकांच्या पेरणीची कामे पूर्ण झाली आहेत, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले यांनी दिली.
 
जुन्नर तालुक्यात सततच्या पावसामुळे फळ भाजीपाला पिकांवर कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. कृषी विभागाने खरीप हंगामातील पिकांचे नियोजन केले आहे. तालुक्यात मे महिन्यात सरासरी 190 मिलिमीटर तर जून महिन्यात सरासरी 148 मिलिमीटर असा एकूण सरासरी 338 मिलिमीटर पाऊस झाला आहे. यावर्षी जून महिन्यात वेळेवर पाऊस झाल्याने सुरुवातीच्या काळात खरीप पिकांच्या पेरणीच्या कामांनी वेग घेतला होता. 60 टक्के पेरणीची कामे पूर्ण झाली आहेत. यावर्षी वेळेत व समाधानकारक पाऊस झाल्याने शंभर टक्के खरिपाची पेरणी होईल, असा कृषी विभागाचा अंदाज आहे.
 
तालुक्यात सोयाबीन पिकाखाली सर्वाधिक 13 हजार 500 हेक्टर क्षेत्र आहे. मुख्य पीक असलेल्या सोयाबीन पिकाची एक हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली असून, उतार समाधानकारक आहे. अकरा हजार हेक्टर पैकी नऊ हजार हेक्टर क्षेत्रातील भात रोपांच्या पुनरलागवडीची कामे पूर्ण झाली आहेत. पेरणी झालेल्या सोयाबीन, भुईमूग, तेलबिया, कडधान्य, मका बियाणांचा उतार चांगला झाला आहे. मागील चार ते पाच दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने तन काढणे, पिकाला भराव देणे, खतांचा डोस देणे, फवारणी करणे आदी पिकांच्या अंतर मशागतीची व शिल्लक खरीप पिकांच्या पेरणीची कामे लांबली आहेत.
 
जून महिन्यात सर्वाधिक 225 मिलिमीटर पाऊस पिंपळगाव जोगे धरण पाणलोट क्षेत्रात झाला आहे. यामुळे पिंपळगाव जोगे धरणात 4.495 टीएमसी मृत पाणी साठ्याची पातळी पूर्ण होऊन उपयुक्त पाणीसाठा होण्यास सुरुवात झाली आहे. आज अखेर कुकडी प्रकल्पात 8.522 टीएमसी (28.72 टक्के) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे, अशी माहिती कुकडी पाटबंधारे विभाग क्रमांक एकचे उपकार्यकारी अभियंता रवींद्र हांडे यांनी दिली.
 
जुन्नर तालुक्यात रासायनिक खतांचा मुबलक साठा उपलब्ध आहे. सहाशे टन युरिया खताचा बफर स्टॉक (राखीव साठा) आहे. शेतकर्‍यांना प्रायोगिक तत्त्वावर 125 क्विंटल फुले किमया 753 या जातीचे सोयाबीन व 102 क्विंटल भुईमूग बियाण्याचे वाटप करण्यात आले आहे. शेतकर्‍यांना बीज प्रक्रिया, युरिया ब्रिकेटचा वापर, चार सूत्री भात लागवड, खते आणि बियाणे बचत याबाबत मार्गदर्शन केले असल्याचे तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले यांनी सांगितले.
 

Related Articles