कोण आहे पराग जैन   

केंद्र सरकारने १९८९ च्या बॅचचे पंजाब केडरचे आयपीएस अधिकारी पराग जैन यांची रिसर्च अँड अ‍ॅनालिसिस विंगचे (रॉ) नवे प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. जैन हे रवी सिन्हा यांची जागा घेतील, सिन्हा यांचा कार्यकाळ उद्या (सोमवारी) संपत आहे. जैन १ जुलै रोजी दोन वर्षांच्या निश्चित कालावधीसाठी पदभार स्वीकारतील.
 
पराग जैन  
 
० जैन सध्या एव्हिएशन रिसर्च सेंटरचे प्रमुख आहेत. जैन हे यापूर्वी चंदीगडचे पोलिस अधीक्षक आणि लुधियानाचे उपमहानिरीक्षक देखील राहिले आहेत. त्यांनी कॅनडा आणि श्रीलंकेत भारतीय प्रतिनिधी म्हणूनही काम केले आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादविरोधी कारवाईत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांना दोन दशकांहून अधिक काळ पोलिस दलाचा अनुभव आहे. 
 
ऑपरेशन सिंदूरमध्ये महत्त्वाची भूमिका 
 
० पाकिस्तानविरुद्धच्या ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तान सशस्त्र दलांबद्दल गुप्त माहिती गोळा करण्यात जैन आणि त्यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांनी दहशतवादी संरचनांना अचूकतेने लक्ष्य करण्यात मदत केली. दहशतवादी संरचनांसोबतच पाकिस्तानी सैन्याशी संबंधित गुप्त माहितीही त्यांनी मिळवली होती. 
 
दहशतवादाचा कर्दनकाळ 
 
० जैन हे दहशतवादाचा कर्दनकाळ मानले जातात. अफगाणिस्तान-पाकिस्तान प्रदेशावर लक्ष केंद्रित करून, विशेषतः सीमापार दहशतवादी नेटवर्क्स डीकोड करण्यात ते तरबेज होते. दहशतवादविरोधी तज्ज्ञ म्हणून त्यांची तज्ज्ञता येत्या काळात रॉच्या भूमिकेला आकार देईल.
 
कलम ३७० हटवण्यात योगदान  
 
० जैन यांनी जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवणे आणि बालाकोट एअरस्ट्राइकसारख्या महत्त्वाच्या कारवायांमध्येही योगदान दिले आहे. विशेषतः पाकिस्तान डेस्क हाताळण्यात त्यांची खासियत होती.
 
नव्या जबाबदार्‍या
 
 ० बाह्य सुरक्षेशी संबंधित सर्व माहिती वेळेत गोळा करणे आणि ती सरकारला देणे ही जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे. यासोबतच दहशतवाद थांबवणे आणि त्यांच्याविरुद्ध गुप्त कारवाया करणे, परदेशी सरकारे, कंपन्या आणि स्रोतांकडून मिळालेल्या माहितीवर त्यांना काम करावे लागणार आहे. जेणेकरून भारतीय धोरणकर्त्यांना योग्य सल्ला देता येईल.
 
‘सुपर डिटेक्टिव्ह’ 
 
० जैन यांना गुप्तचर विभागात ‘सुपर डिटेक्टिव्ह’ म्हणूनही ओळखले जाते. मानवांच्या मदतीने गुप्त माहिती मिळविण्यासोबतच ते तंत्रज्ञानाच्या मदतीने गुप्त माहिती जमा करण्यातही सक्षम आहेत. 

Related Articles