व्हॉट्सऍप कट्टा   

माउलींचे सिद्धबेट...

माउलींचे सिद्धबेट समाधी मंदिरापासून थोडेसे दूर, थोडेसे अलिप्त, कमी वर्दळ असलेले प्रसन्न असे ठिकाण आहे. येथेच श्री संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांनी लहानपणी वास्तव्य केले होते. बहिष्कृत केल्यानंतर आई-वडील आणि चारही भावंडे येथे छोट्या पर्णकुटीत वास्तव्य करून होते. आज या ठिकाणी एक मोठ्या पत्र्याच्या शेडमध्ये ही पर्णकुटी आहे. तिथे एक छोटे शिवलिंग, विठ्ठल रखुमाईची मूर्ती तसेच ज्ञानेश्वरांची एक सुंदर मूर्ती आहे. तसेच चारही भावंडांच्या पादुका आहेत. येथे माणसांची ये-जा फार कमी आहे. शांत-निवांत सुंदर ठिकाण आहे. आजूबाजूला झाडी तसेच फुलझाडे आहेत. बाग जोपासली जात आहे. पत्र्याच्या शेड बाहेर जुना अजानवृक्ष आहे. तसेच सिद्ध परिक्रमा मार्ग आहे. हे ठिकाण इंद्रायणी नदीच्या काठावर आहे. तसेच माउलींच्या आई-वडिलांनी जेथे जलसमाधी घेतली ते ठिकाण येथेच आहे. येथेच मुक्ताईंनी श्री ज्ञानेश्वर माउलींसाठी ताटीचे अभंग लिहिले. शेडमध्येच एका बाजूला भिंतीवर या स्थानाचे महत्त्व लिहिले आहे. ब्रह्मदेवापासून ते इंद्रापर्यंत अनेकांनी येथे याग करून ही भूमी पवित्र केली. येथील भिंतींवर असा श्लोक आहे की, हे स्थान फार प्राचीन आहे आणि कल्पांताच्या वेळेस सुद्धा हे स्थान राहणार आहे.
 
आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव |
दैवताचे नाव सिद्धेश्वर ॥१॥
चौर्‍यांशी सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा |
तो सुख सोहळा काय वर्णू ॥२॥
 
संत नामदेव म्हणतात, की चौर्‍यांशी सिद्धांचा मेळावा ज्यात नाथ संप्रदाय व साधुसंतांचा समावेश आहे. त्यांचे हे उपासना स्थान आहे. याचा नवनाथांशी संबंध आहे, जे नऊ नवनाथ आहेत त्यांचे ८४ शिष्य आहेत. यात वारकरी संप्रदायातील साधूसंताचाही समावेश आहे.
आदिनाथ गुरु सकाळ सिद्धांचा |
मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य ॥१॥ मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला | गोरक्ष ओळला गहिनीप्रती ॥२॥ गहिनीप्रसादे निवृत्ती दातार | ज्ञानदेव सारा चोजाविले ॥३॥
 
ज्ञानेश्वर माउलीही नाथ संप्रदायातील होते. त्यांनी आपली गुरुपरंपरा यातून संबोधित केली आहे.संत नामदेवांनी जो सिद्ध संतांचा मेळावा म्हटले आहे, त्यात.... नाथ संप्रदाय, दत्त संप्रदाय, महानुभव पंथ, लिंगायत संप्रदाय, समर्थ संप्रदाय, वारकरी संप्रदायही येतात.यातील नाथ संप्रदायातील गोरक्षनाथांनी अनेक धर्माचे अनुयायी नाथपंथात सामावून घेतले. तेच हे चौर्‍यांशी सिद्ध होत. यातूनच पुढे नाथ संप्रदायातील गुरु-शिष्य परंपरा चालू झाली. महाराष्ट्रातही भक्तिमार्गात ही परंपरा चालू राहिली.
 
सिद्धबेट या स्थानी प्रत्यक्ष आदिनाथ म्हणजेच श्री भगवान शंकरापासून निर्माण झालेली नागपरंपरा वास करत असे येथील लोक मानतात. ज्ञानेश्वरांनी असे म्हटले आहे, प्रत्यक्ष गहिनीनाथ महाराज आले आणि नाथ संप्रदायाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. सकल नाथ सिद्ध परंपरा ज्ञानदेवांसोबत असून ते या कलियुगी नाम सामर्थ्य लोकांपर्यंत पोचवत आहेत. ज्ञानदेव म्हणतात की, जो शिवतत्त्व आकृष्ट करून घेतो तो नाथ अधिकारी.
 
नवनाथ चरित्र आणि इतर जसे जैन, बौद्ध साहित्य यातही या चौर्‍यांशी सिद्धांचा उल्लेख आहे आणि यानंतर आपण असे म्हणतो की, नाथ परंपरा ही मध्ययुगीन कालखंडात निर्माण झाली; पण ती खूपच विस्तारलेली आहे. तसेच काही मुघल सुलतानांकडे सुद्धा नाथ संप्रदायातील लोक येत होते, असे पुरावे आहेत. याचा सरळ अर्थ असा आहे की, कोठेतरी कन्टिन्युटी प्रकार आहे.
 
मध्ययुगीन काळात सर्वत्र नाथ संप्रदायाचा प्रभाव होता. महाराष्ट्रात यातूनच वारकरी संप्रदाय वाढला.८४ सिद्ध हे जे वेगवेगळ्या संप्रदायातून आले आहेत ते या पवित्र पावन अशा आळंदीच्या सिद्धबेट या स्थानी एकत्र येतात... यायचे... सिद्धबेट या स्थानी त्यांचा परिक्रमा मार्ग ही आहे. ज्यावरून ५ ते १० मिनिटात आपण परिक्रमा पूर्ण करू शकतो. या ठिकाणाचा विकास होणे शासनाच्या हातात आहे.माऊलींचे पवित्र स्थान जपणे, वृद्धिंगत करणे, आपल्याच हातात आहे. 
 
- ऐश्वर्य जोशी-आकूत (Email: aishwaryjoshi202gmail.com)

Related Articles