हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटीसारखा पाऊस   

प्रचंड नुकसान, घरे पुरात वाहून गेली

कुल्लू : हिमाचल प्रदेशच्या कुल्लूमध्ये ढगफुटी सारखा पाऊस झाला आहे. अचानक मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे नद्यांना पूर आला आहे. पुरात बऱ्याच  ठिकाणी घरांचे नुकसान झाले. ढगफुटी सदृष्य पावसाचे व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाले. पावसामुळे कुल्लूमधील सध्याची परिस्थिती खूपच भयावह दिसत आहे.
 
कुल्लू जिल्हा मुख्यालयाला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग औट-लुहरी-सैंज रस्ता वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद केला आहे. बंजरमधील दोन कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी आलेले दोन मंत्रीही अडकले. यामध्ये कृषी आणि पशुसंवर्धन मंत्री प्रा. चंद्र कुमार, तंत्रशिक्षण, व्यावसायिक आणि औद्योगिक प्रशिक्षण मंत्री राजेश धर्मानी यांचा समावेश आहे. 
 
मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे लोकांचे मोठे नुकसान झाले. रस्ते बंद झाले आहेत आणि घरांमध्ये पाणी शिरले आहे. मणिकरण व्हॅली, सैंज आणि बंजर येथे आलेल्या पुरामुळे बऱ्याच घरात पाणी शिरले. सैंजच्या जिवा नाल्यात आलेल्या पुरामुळे, सिनुडमध्ये एनएचपीसी शेड वाहून गेले आहेत. 

पावसामुळे शहरात गोंधळ

सैंज मार्केटमध्ये एक कॅम्पर आणि एक स्कूटी वाहून गेली. बऱ्याच ठिकाणी रस्ता खराब झाला आहे. पुराची माहिती मिळताच लोकांमध्ये गोंधळ उडाला. यानंतर लोकांनी आपली घरे रिकामी करण्यास सुरुवात केली. सैंज खोऱ्यातील सखल भागात राहणाऱ्या लोकांना सावध केले आहे. प्रशासनाने बचावकार्य सुरू केले आहे. 
 

Related Articles