वाचक लिहितात   

बेरोजगारीचे भेसूर वास्तव
 
केंद्र सरकारच्या सांख्यिकी विभागाच्या मासिक सर्वेक्षणानुसार देशांतर्गत बेरोजगारीचा दर मे महिन्यात अर्धा टक्क्यानी वाढला आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत दरवर्षी दोन कोटी रोजगार निर्माण करू अशी ग्वाही देत मोदी सरकार सत्तेत आले. मोदी सत्तेत येऊन आज आज अकरा वर्षे लोटली; उलटपक्षी देशाअंतर्गत बेरोजगारीने भेसूर रूप धारण केले आहे. केंद्र आणि राज्ये सरकारांमध्ये मिळून रोजगारासाठी एकूण ३० लाख पदांचा अनुशेष भरायचा आहे, अशी जाहीर कबुली मोदी सरकारने मध्यंतरी दिली आहे. तथापि ती पदे भरण्यासाठी वित्तीय तरतूद अपुरी पडते. कारण सरकारचा ६० टक्क्यांहून अधिक खर्च कर्मचारी वेतन आणि निवृत्तीवेतनावर खर्च होतो. उरला सुरला निधी मतोपासनेतील खैरातीवर - रेवडीवर खर्च होतो. त्यामुळेच विकास आणि रोजगार अशांसाठी खासगी क्षेत्रावर भिस्त ठेवावी लागते; पण त्या क्षेत्राचे प्राधान्यक्रम राष्ट्रीय उद्दिष्टांशी जुळत नाहीत. यातही महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सरकारी नोकर्‍या मोठ्या प्रमाणात निर्माण करणार्‍या आस्थापनांचे जसे की, एलआयसी, बँका, रेल्वे आदींचे पूर्णतः वा अंशतः खासगीकरण धोरण आक्रमकपणे अवलंबले जात आहे. यातून रोजगाराच्या संधी कमीच होणार आहेत.
 
भारताच्या आजच्या लोकसंख्येत ६८ टक्के जनता १५-६४ या वयोगटातील आहे. या वयोगटातील लोकांना काम मिळाले तर स्वातंत्र्याची शताब्दी करताना २०४७ मध्ये भारताची अर्थव्यवस्था ४० ट्रिलियन डॉलर्स होऊ शकेल. २०३० पर्यंत या वयोगटात आणखी १० कोटींहून अधिकची भर पडेल. २०३६ पर्यंत देशात दरवर्षी ८० लाख नवे रोजगार निर्माण होणे गरजेचे आहे, असे राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाचे म्हणणे आहे. या वयोगटातील लोकांच्या हाताला काम द्यायचे तर देशाची अर्थव्यवस्था दरमहा - दरसाल सरासरी ८-८.५ टक्क्यांनी वाढणे गरजेचे आहे. देशातील बेरोजगारीच्या दुखण्यावर उपाय म्हणून सरकारने आर्थिक सुधारणा आक्रमकपणे राबवणे आणि देशांतर्गत उद्योगस्नेही वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे. यातील एक न करता दुसरे होणारे नाही. एका बाजूला विकास, समृद्धी, संपन्नता, क्रयशक्ती वगैरे प्रगतीची सगळी मापदंडे केवळ कविकल्पना वाटाव्यात असे आजचे देशाअंतर्गत बेरोजगारीचे भेसूर वास्तव आहे. दुसरीकडे दिशाहीन सरकारी धोरणांमुळे तरुणांच्या हाताला काम नाही म्हणून त्यांच्या हातात धर्माचे झेंडे दिले जात आहेत; जोडीला राष्ट्रवादाचा रतीब सुरू आहेच. भारताला जो डेमोग्राफिक डिव्हिडंट मिळायला हवा होता.
 
बाळकृष्ण शिंदे, पुणे
 
महाराष्ट्रातील विद्यापीठांची कामगिरी
 
जगभरातील दीड हजारपेक्षा अधिक उच्च शिक्षण देणार्‍या संस्थांच्या तसेच विद्यापीठांच्या शैक्षणिक गुणवत्तेसंदर्भातील लंडनस्थित क्वाकरेली सायमंड (क्यूएस)ची जागतिक क्रमवारी २०२६ नुकतीच जाहीर करण्यात आली. या जागतिक क्रमवारीत ‘मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ (एमआयटी) या उच्च शिक्षण संस्थेला जगातील सर्वोत्तम विद्यापीठ म्हणून स्थान देण्यात आले आहे. या यादीनुसार आयआयटी दिल्लीने जगात १२३ वे स्थान मिळवले असून देशात पहिला क्रमांक मिळवला आहे. आयआयटी मुंबई (जगात १२९ वे स्थान) आणि आयआयटी मद्रास (१८० वे स्थान) अनुक्रमे दुसर्‍या आणि तिसर्‍या स्थानावर आहेत. महाराष्ट्रातील आयआयटी मुंबईसह सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठ (देशात १५ वे), मुंबई विद्यापीठ (देशात १८ वे) आणि सिंबायोसिस इंटरनॅशनल, अभिमत विद्यापीठ, पुणे (देशात २२ वे) या चार विद्यापीठांना देशांतर्गत यादीत स्थान मिळाले आहे. विशेष म्हणजे मुंबई विद्यापीठाने सर्वोत्तम शैक्षणिक कामगिरी करून मागील वर्षाच्या तुलनेत जागतिक क्रमवारीमध्ये मोठी सुधारणा केली. एकूणच महाराष्ट्रातील विद्यापीठांची ही उंचावत जाणारी शैक्षणिक कामगिरी कौतुकास्पद असून महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
 
प्रदीप मोरे, अंधेरी (पूर्व), मुंबई
 
‘राष्ट्रवादी’चे एकीकरण?
 
लोकांनी निवडून दिल्यावर निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना लोकांच्या मतांचे विस्मरण होते. महायुती सरकार पक्षाचे घटक पक्ष सत्तेतील फायद्यांसाठी एकमेकांना सावरून घेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि मूळची शिवसेना यांच्या नेत्यांचे, कार्यकर्त्यांचे त्यांच्या पक्षांतून अजूनही आउटगोइंग सुरूच आहे. पक्षांतर करणारे नेते, कार्यकर्ते भविष्यात आपल्याला होऊ शकणार्‍या वैयक्तिक लाभांपायी पक्षांतरे करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर मूळ राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुखांनी आपला पक्ष संधिसाधू राजकारण करणार्‍यांचे समर्थन करणार नाही आणि धर्मनिरपेक्ष विचार असणार्‍यांशीही समझोता करणार नाही असे म्हटले आहे; मात्र हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वसंतदादा पाटील यांचे सरकार उलथवून स्वतः मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले होते. केंद्रात सोनिया गांधी विदेशी असल्याच्या मुद्द्यावरून स्वतंत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना त्यांनी केली. सोनिया गांधी स्वतः मंत्रिमंडळात नव्हत्या, तरी शरद पवारांनी त्यांच्याच अधिपत्याखाली चालविल्या गेलेल्या केंद्र सरकारमध्ये दहा वर्षे कृषिमंत्रीपद भूषविले. धर्मनिरपेक्षता, विदेशी नागरिकत्व असणार्‍या सोनिया गांधींच्या अधिकाराखाली सत्तेत सहभाग घेतला. या सर्वांचा विचार करताना नव्या पिढीच्या नेत्यांना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकीकरणाच्या चर्चा थांबविल्याचे विधान केले आहे. त्यामागे नेमक्या काय चाली असू शकतात हे ध्यानात येण्यास थोडा वेळ लागेल; पण इतिहासात मागे वळून पाहता एखाद दुसरी सुप्त इच्छापूर्तीसाठी तर हे प्रयत्न नसतील ना, अशा शंका निर्माण होत आहेत.
 
स्नेहा राज, गोरेगांव.
 
असंवेदनशील विश्लेषण
 
दूरचित्रवाणी मालिका आणि चित्रपटसृष्टीतील उमदा, मेहनती कलाकार आणि संवेदनशील लेखक तुषार घाडीगावकर यांच्या आत्महत्येची बातमी मन सुन्न करणारी ठरली. आपल्या समाजात मानसिक ताणतणाव, संवादाची गरज आणि भावनिक एकाकीपणा यांच्याकडे अजूनही पुरेशा गांभीर्याने पाहिले जात नाही. एखादी व्यक्ती बाहेरून यशस्वी, हसरी आणि उत्साही वाटत असली तरी तिच्या अंतर्मनात काय सुरू आहे, हे समजून घेण्यासाठी आपल्याला अधिक संवेदनशील आणि जागरूक होणे आवश्यक आहे. अविरत संघर्ष, अस्थिरता आणि आपल्या भावनांबद्दल बोलण्याचा अभाव - यामुळे अनेक वेळा सुन्न करणार्‍या, टोकाच्या घटना घडतात. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. आत्महत्येसारख्या नाजूक आणि खोल परिणाम करणार्‍या घटनांचे सवंग सुलभीकरण करणे, कारणे गृहीत धरून सनसनाटी मथळे देणे, हे टाळायला हवे. अशा बातम्यांनी संबंधित कुटुंबीयांना अनावश्यक वेदना होतात आणि समाजातही चुकीच्या प्रतिक्रिया उमटू शकतात. या निमित्ताने कला क्षेत्रातील असुरक्षिततेच्या मुद्द्यांवर विचार करणे हीच तुषारसारख्या संवेदनशील कलाकाराला खरी श्रद्धांजली ठरेल.
 
दीपक गुंडये, वरळी.
 
रस्त्यावरील पदार्थ नकोच
 
उघड्यावरील आणि रस्त्यावरील वडे, भजी, समोसे, पाणीपुरी, दाबेली वगैरे एरवीही तब्येतीला धोकादायक असतात; पण पावसाळ्यात ते अधिकच धोकादायक बनतात. त्यावर बसणार्‍या माशा, कीटक व थंड वातावरणामुळे जमणारी बुरशी यामुळे रोगांचा प्रादुर्भाव अधिक जलदरीत्या होऊ शकतो. म्हणून विविध आरोग्य तज्ज्ञ तसेच अन्न व औषध प्रशासन विभाग पावसाळ्यात हे पदार्थ टाळण्याचे आवाहन करतात. तरीही समाजाचा मोठा भाग हे न ऐकता बिनदिक्कतपणे रस्त्यावरचेच अन्नपदार्थ सदान्कदा सेवन करीत असतो. आपण खात असलेले उघड्यावरील पदार्थ शरीरासाठी अपायकारक आहेत हे माहीत असूनही समाजातील हा मोठा वर्ग ते खात असतात. याचे मुख्य कारण म्हणजे त्यांचे जिभेवर नसलेले नियंत्रण. जिभेचे चोचले पूर्ण करणे म्हणजे आजारांना निमंत्रण देणे. जोवर जिभेचे चोचले बंद होणार नाही, तोवर हे पदार्थ असेच विकले जाणार. 
 
श्याम ठाणेदार, दौंड जि. पुणे

Related Articles