कथा जानकीच्या जन्माची   

भावार्थ रामायणातील कथा , विलास सूर्यकांत अत्रे

जनकाने विश्वामित्रांसह सर्व ऋषीमुनींना सीतेची पूर्व पीठिका सांगण्यास सुरुवात केली. तो म्हणाला, ‘सीता माझी कन्या आहे; पण तिने माझ्या पोटी जन्म घेतलेला नाही. ती अयोनिजा आहे.‘ एव्हढे बोलून त्याने शतानंद याच्याकडे पाहिले. शतानंद हा अहल्येचा मुलगा आणि जनकाचा राजपुरोहित. जनकाच्या मनातले ओळखून, जनकाकडे सस्मित पाहात शतानंद सीतेची पूर्व कथा सांगू लागला, ‘श्रीराम हा ब्रह्ममूर्ती आहे, तर सीता ही आद्यशक्ती आहे. पद्माक्ष नावाचा राजा होता. तो अतिशय पवित्र, पुण्यवान राजा होता. त्याने लक्ष्मीचे अनुष्ठान केले. ती प्रसन्न झाली आणि ‘हे राजन तुला काय हवे’ अशी विचारणा केली, त्यावर पद्माक्ष राजाने लक्ष्मीला तू माझ्या पोटी जन्म घ्यावा, तू माझी कन्या व्हावीस, अशी मागणी केली.
 
त्यावर लक्ष्मीने त्याला सांगितले की, ‘मला जन्म नाही. मला गर्भवास नाही. मी कोणाच्याही उदरात जन्म घेणारी नाही. भगवंताशिवाय कुणालाही माझा लाभ होत नाही‘. पद्माक्ष राजाने त्यानंतर भगवंताचे अनुष्ठान केले आणि त्यांना प्रसन्न करून घेतले. भगवंताने हे राजन तुला काय हवे आहे, अशी विचारणा केली असता पद्माक्ष राजाने लक्ष्मीने आपल्या पोटी कन्या म्हणून जन्म घ्यावा, अशी आपली इच्छा व्यक्त केली. भगवंतांनी पद्माक्ष राजाची खूप समजूत काढण्याचा प्रयत्न केला. संपत्तीच्या हव्यासाने लक्ष्मीचे आगमन अतिशय गोड वाटते; पण त्याच लक्ष्मीने पाठ फिरविल्यास ते खूप वेदनादायी असते. ती येते तेव्हा सुख वाटते, ती जाते तेव्हा केवळ दु:ख मागे उरते. तरीही पद्माक्ष राजाने आपला हट्ट सोडला नाही. तेव्हा भगवंताने पद्माक्ष राजाच्या हातात एक महाळुंग (मातुलिंग) दिले आणि सांगितले, जा तुझी लक्ष्मी ही कन्या होईल. पद्माक्ष राजाने त्या महाळुंगाचे दोन भाग केले. त्या महाळुंगाच्या पोटात अतिशय गोड अशी बाळ रूपातील कन्या त्याला दिसली. वात्सल्याने पद्माक्ष राजाचा ऊर भरून आला. त्याच्या घरात लक्ष्मीने जन्म घेतला होता. पद्माक्ष राजाच्या घरात ती अवतरली म्हणून तिचे नाव पद्मावती. नंतर त्या महाळुंग्याची दोन्ही शकले एक झाली, त्या महाळुंग्याची झाली मातुलिंग देवी. 
 
पद्मावती वयात येऊ लागली. तिच्या रूपावर अनेक राजे भाळून गेले. तिच्या प्राप्तीसाठी त्यांच्यात चढाओढ सुरू झाली. तिच्या प्राप्तीसाठी ते काहीही करतील अशी भीती पद्माक्ष राजाला वाटली. तिला चांगला जोडीदार मिळावा म्हणून पद्माक्ष राजाने तिचे स्वयंवर रचले. त्याने स्वयंवरासाठी पण जाहीर केला. ज्याच्या कांतीवर आकाशाचा सुनीळ रंग साजरा दिसेल, त्यालाच माझी कन्या वर म्हणून निवडेल आणि त्याच्या गळ्यात वरमाला घालेल.
 
घनघोर युद्ध
 
पद्मावतीच्या मोहापायी या स्वयंवराला देव, दानव, यक्ष, किन्नर, ऋषिवर्ग असे सगळेच जमले. पद्माक्ष राजाने ठेवलेला पण पूर्ण करण्याची कोणाचीच क्षमता नव्हती. पद्मावतीच्या स्वयंवराचा पण सगळ्यांना समजला. त्याची पूर्तता करणे कुणालाच शक्य नसल्याचे त्यांना समजून आले. पद्मावतीच्या मोहापायी पद्माक्ष राजाने ठेवलेला पण ऐकून सगळ्यांचा क्षोभ पराकोटीला गेला आणि पद्मावतीचे हरण करता यावे, तिला पळवून नेता यावे, या उद्देशाने ते तिला घेरू लागले. स्वयंवरासाठी जमलेल्या लोकांचा हा आततायीपणा पाहून पद्माक्ष राजाचे पित्त खवळले, त्याचा संताप अनावर झाला. या सगळ्यांना धडा शिकवायचा असे त्याने ठरविले. त्याने आपले धनुष्यबाण सज्ज केले आणि या सर्वांवर बाणांचा वर्षाव सुरू केला. पद्माक्ष राजाने बाणांचा वर्षाव सुरू करताच त्याला जमलेल्यांनी तसेच उत्तर देण्यास सुरुवात केली. परिणामी तिथे घनघोर युद्ध सुरू झाले. अनेकांनी पाठ दाखवून तिथून पळ काढला. अनेकांनी आपले प्राण गमावले; मात्र त्या सगळ्यांपुढे पद्माक्ष राजाचा निभाव लागला नाही. त्याला या युद्धात आपले प्राण गमवावे लागले. स्वयंवराचा शेवट हा असा भयानक झाला. पद्मावतीने हे सारे पाहून अग्निमध्ये प्रवेश केला. स्वयंवरासाठी आलेल्या देव दानवांनी त्यांच्या हातात काहीच न मिळाल्याने पद्माक्ष राजाच्या संपूर्ण नगरीचा विध्वंस केला. लक्ष्मीच्या अभिलाषाने कसा विनाश घडतो हे अनुभवास आले.
 
पद्मावतीचे हरण
 
सगळे नगर उद्ध्वस्त झाले, स्वयंवरासाठी जमलेले हताश होऊन निघून गेले, पद्माक्ष राजाने प्राणांची आहुती दिली, त्याच्या राण्या सती गेल्या. सगळीकडे स्मशान शांतता झाली. अग्निकुंडात प्रवेश केलेली पद्मावती अग्निकुंडाच्या बाहेर येऊन एका बाजूला बसली. त्याचवेळी रावण तिथून विमानातून जात होता. त्याने नगराची झालेली वाताहत पाहिली. अग्निकुंडाच्या बाहेर बसलेली पद्मावतीही पाहिली. सोबत असलेल्या त्याच्या प्रधानाने रावणाला सांगितले की, अग्निकुंडाच्या बाजूला ती जी बसली आहे, तिच्या प्राप्तीसाठी हे रणकंदन झाले आहे. तिने अग्निकुंडात उडी मारून स्वत:ला वाचविले आहे. पद्मावतीच्या रूपावर रावण भाळला. तिच्या प्राप्तीची रावणाला अभिलाषा झाली, म्हणून पद्मावतीचे हरण करण्यासाठी तो खाली उतरला. रावण पद्मावतीच्या दिशेने पुढे आला असता, त्याच्या पापी हेतूची पद्मावतीला जाणीव झाली. रावण पुढे येताच, त्याच्या हातून निसटण्यासाठी पद्मावतीने पुन्हा अग्निकुंडात उडी मारली. पद्मावतीने अग्निकुंडात मारलेली उडी पाहून रावणाचा क्रोध अनावर झाला. तो मनाशी म्हणाला की, ‘अग्निकुंडात लपून बसलेल्या पद्मावतीला सुरवर शोधू शकणार नाहीत; पण त्यांच्याहून मी श्रेष्ठ आहे. ती जाऊन जाऊन जाईल कुठे? मी तिला अग्निकुंडातून शोधून काढीन‘.
 
पद्मावतीच्या प्राप्तीसाठी रावणाने ते अग्निकुंड विझवून टाकले. विझवलेल्या कुंडात रावण पद्मावतीचा शोध घेऊ लागला. त्याला कुंडात पद्मावती सापडली नाही; मात्र कुंडात त्याला अतिशय तेजस्वी अशी पंचरत्ने सापडली. ती रत्ने मंदोदरीला द्यावीत, या उद्देशाने रावणाने ती रत्ने पेटीत घालून तो लंकेत परतला.रावण लंकेत पोचला. रावणाने ती पेटी उचलून देवघरात नेऊन ठेवली आणि लगोलग तो राणी महालात गेला. ती रत्ने मंदोदरीला कधी दाखवीन असे रावणाला झाले होतेे. अतिउत्साहाने रावणाने मंदोदरीला देवघरातील पेटी घेऊन येण्यास सांगितले. मंदोदरी ती पेटी आणण्यासाठी देवघरात गेली; मात्र मंदोदरीला ती उचलता येईना. ती पेटी तिला अतिशय अवजड वाटली. तिने जोर लावला, तरीही ती पेटी तिला ढकलता सुद्धा आली नाही. मंदोदरी रावणापाशी आली आणि पेटी जड असल्याने हलवता येत नसल्याचे रावणाला सांगितले. ते ऐकून रावणाला हसू आले. हसत हसत त्याने मंदोदरीची टिंगल केली आणि तो स्वत: पेटी आणण्यासाठी देवघरात गेला. रावण ती पेटी उचलण्यास गेला खरा; पण त्यालाही ती पेटी उचलणेच काय हलविणेही शक्य झाले नाही. तो सर्व ताकदीनिशी पेटी ढकलण्याचा प्रयत्न करू लागला, अगदी घामाघूम झाला; पण ती पेटी जागची तसूभरही हलली नाही. हा काय प्रकार आहे? त्यामुळे रावण अतिशय घाबरला. त्याने लगेच प्रधानाला आणि इतर सर्व स्नेही आप्तजनांना बोलावून घेतले. ती पेटी उघडून आत काय ठेव आहे हे पाहू असा सगळ्यांनी रावणाला सल्ला दिला. भीतभीत रावणाने ती पेटी उघडली आणि सगळे उत्सुकतेने पेटीत काय आहे हे पाहू लागले. पेटीमध्ये अत्यंत तेजस्वी असे सहा महिन्यांचे कन्यारत्न होते.
 
मंदोदरीसह सर्वांना रावणाने पद्मावतीची घडलेली कथा सांगितली. स्वत:च्या वडिलांचा आणि कुळाचा विनाश करणारी पद्मावती ही मंदोदरीला कन्या न वाटता ती कृत्या वाटली. तिचा प्रतिपाळ केल्यास ती पालनकर्त्याचे कुळासह विनाश करील, या भवितव्याची तिला जाणीव झाली. तेव्हा या कृत्येला राज्याबाहेर सोडून द्यावे आणि होणारा अनर्थ थांबवावा, असा सल्ला मंदोदरीने रावणाला दिला. मंदोदरीचा हा सल्ला रावणाला पटला. त्याने लगेच नोकरचाकरांना बोलावले. ती पेटी त्यातील छोट्या बाळासह राज्याबाहेर नेऊन टाकण्याचे रावणाने ठरविले. ती पेटी राज्याबाहेर नेण्यासाठी रावणाने त्याचे विमान तयार केले. रावणाला मंदोदरी म्हणाली की, ‘मला वाटते की, ही पेटी कुठेही उघड्यावर टाकून देऊ नये. ती भूमिगत करावी, ती उघड्यावर ठेवली तर तिथे तात्काळ अनर्थ माजेल. जो कोणी गृहस्थाश्रमी असूनही मुक्त आहे त्याच्या घरात ती वाढेल आणि जो आत्मतत्त्व जाणून चराचरात वावरतो त्याच्या घरात ती नांदेल‘. मंदोदरीचा सल्ला रावणाला योग्य वाटला. मंदोदरीच्या सल्ल्याप्रमाणे रावणाचे सेवक पेटी उचलून विमानात ठेवत असताना पेटीतून आवाज आला ‘रावणा तू परत माझी अभिलाषा धरशील तेव्हा मी परत लंकेत येईन आणि तुझ्यासह सर्व राक्षसांचा विनाश करीन‘ हे बोल ऐकून रावणाच्या जीवाचा थरकापच झाला. पेटी घेऊन रावण निघाला. तो जनकाच्या राज्यात पोचला. तिथे आल्यावर एका शेतात ती पेटी त्यांनी पुरून टाकली. ती जमीन जनकाने एका ब्राह्मणाला शेती करण्यासाठी दिलेली होती. एके दिवशी जमीन नांगरताना नांगराच्या फाळाला ती पेटी लागली. गरीब ब्राह्मणाने ती पेटी बाहेर काढली. जनकाने जमीन मला कसायला दिलेली आहे, वरचे पीक माझे आहे जमिनीच्या पोटातील वस्तू नाही. ते राजधन आहे, ते माझे नाही, राजाचे आहे. जनकाला ते परत करावे म्हणून पेटी घेऊन तो जनकाकडे आला.
 
जनकाने पितृत्व स्वीकारले
 
जनकाला ब्राह्मणाचे म्हणणे पटले नाही. ब्राह्मणाला जमीन दिली म्हणजे त्या जमिनीतून जे काही मिळेल ते सारे ब्राह्मणाचेच आपला त्यावर कसलाही अधिकार नाही, असे म्हणून जनकाने ती पेटी घेण्यास नकार दिला. ब्राह्मणाला किंवा जनकाला कोणालाच धनलोभ नव्हता; पण ब्राह्मणाच्या अट्टहासामुळे जनकापुढे पेचप्रसंग उभा राहिला. आधी पेटी उघडून बघू त्यात काय धन आहे हे पाहू आणि नंतर ते कोणाचे याचा मार्ग काढू असा सल्ला सचिवांनी दिला. जनकाला ते म्हणणे योग्य वाटले म्हणून त्याने उत्सुकतेने पेटी उघडली असता, पेटीमध्ये अतिशय नाजूक, गोड, लोभस असे बाळ होते. तीच ही सीता. प्रजा म्हणजे राजाची अपत्येच असतात. तिला पाहताच जनकाचे वात्सल्य जागे झाले. जनकाला तिचा  पिता झाल्यासारखे वाटले. तीच ही त्याची कन्या जानकी होय. जनकाने ही आनंद वार्ता नगरात मंगलवाद्ये वाजवून डंका पिटवून दिली. धरणीतून मिळाली म्हणून तिला धरणिजा हे नाव मिळाले, तर जनकाने पालन केले म्हणून जानकी हे नावेही मिळाले. ती मूळमाया जगदंबा होती.
 
(आधार - संत एकनाथकृत भावार्थ रामायण बालकांड अध्याय १५)

Related Articles