महापालिकेच्या तिजोरीत ९३२ कोटींचा मिळकतकर जमा   

पुणे: महापालिकेचा मिळकतकर भरताना सवलत मिळविण्यासाठी सहा दिवस बाकी राहिले असून आतापर्यंत महापालिकेने जाहीर केलेल्या सवलतीचा फायदा घेत तब्बल ९३२ कोटींचा मिळकतकर महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे. ३० जूनपर्यंत मिळकतकराची रक्कम भरणार्‍या मिळकतदारांना बिलात पाच ते दहा टक्के सवलत दिली जात आहे. नागरिकांना आता केवळ पुढील सहा दिवस सवलतीच्या दरात मिळकतकर भरता येणार आहे.
 
महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत म्हणून मिळकतकर विभागाकडे पाहिले जाते. यंदाच्या चालू आर्थिक वर्षामध्ये मिळकतकर विभागाला ३२५० कोटी रुपयांचा महसूल गोळा करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. अधिकाधिक नागरिकांनी मिळकतकराची रक्कम महापालिकेकडे भरावी, यासाठी महापालिकेने सुरुवातीचे दोन महिने मिळकत कर भरणार्‍यांना सर्वसाधारण करात पाच ते दहा टक्के सवलत देण्यास सुरुवात केली आहे. याचा फायदा घेत आतापर्यंत ५ लाख ७९ हजार ५८८ जणांनी सुमारे ९३२ कोटी ३९ लाख रुपयांचा महसूल आतापर्यंत महापालिकेच्या तिजोरीत जमा केला आहे.
 
महापालिकेकडे वेगवेगळ्या प्रकारची सुमारे १७ हजार कोटींची थकबाकी असल्याचे दिसते. मात्र, ही संपूर्ण थकबाकी वसूल होणे अशक्य आहे. यामध्ये शहरात असलेल्या मोबाईल मनोर्‍याच्या मिळकतकराची थकबाकी सर्वसाधारण चार हजार कोटी असून ती सर्वात अधिक आहे. त्यापाठोपाठ दुबार मिळकतकराची थकबाकी ४ हजार कोटींच्या घरात आहे. महापालिकेने जादा मिळकतकर आकारल्याने न्यायालयात दावे दाखल असलेल्या मिळकतकराची दीड हजार कोटींची तर महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधील १९०० कोटींची थकबाकी आहे.
 
थकीत मिळकतकरापैकी दुबार तसेच समाविष्ट गावांच्या प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न प्रशासनाचा आहे, असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी यांनी सांगितले. जून महिना संपल्यावर थकबाकी वसूल करण्याचे नियोजन महापालिकेने केले असल्याचे मिळकतकर विभागातील अधिकार्‍यांनी सांगितले.
 
सवलतीच्या दरात मिळकतकर नागरिकांना भरण्याची मुदत ३० जूनपर्यंत असणार आहे. नागरिकांना त्याचा फायदा घेता यावा, यासाठी ऑनलाईन, महापालिकेच्या क्षेत्रिय कार्यालयांमध्ये तसेच महापालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. अंदाजपत्रकात दिलेले उद्दिष्ट गाठण्यासाठी थकबाकी वसूलीसाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.
 
- अविनाश सपकाळ, उपायुक्त, मिळकतकर विभाग.

Related Articles