चाकण परिसरातील वाहतूक कोंडीमुळे नागरिक हैराण   

बेदरकार वाहन चालकांमुळे बळींची संख्या वाढली

संजय बोथरा  

चाकण : चाकण आणि परिसरात असणार्‍या कारखानदारीने बेसुमार वाढलेली वाहनांची संख्या, अपुरे रस्ते, सततची वाहतूक कोंडी, बेदरकार वाहनचालक, प्रशासन आणि प्रशासकांची सुरू असलेली गळचेपी भूमिका आणि वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे चाकणच्या मार्गांवर रोज होणार्‍या जीवघेण्या अपघातात एक तरी बळी जातोय तर एखादा कायमचा जायबंदी होत आहे. मात्र, कोणत्याही राजकीय पुढार्‍याला लक्ष द्यायला वेळ नाही. त्यामुळे मतांसाठी दारोदार फिरणारे लोकप्रतिनिधी आहेत तरी कुठे? असा संतप्त सवाल नागरिक विचारात आहेत.
 
चाकण शहरातून जाणार्या महामार्गावरील तळेगाव - चाकण, पुणे - नाशिक मार्गांसह आंबेठाण रस्ता आणि औद्योगिक क्षेत्रातील प्रत्येक रस्त्यांवर वाहतुक कोंडीचा प्रश्न दररोज भेडसावतो आहे. परंतु, त्यावर तोडगा काढण्यात राजकीय नेते, प्रशासन, पोलिस खात्याला अपयश आले आहे. तास अर्धा तास जागेवर वाहने उभे राहत असल्याने इंधन, वेळ वाया जात आहे. पुणे- नाशिक महामार्गावर तसेच चाकण -तळेगाव, चाकण- शिक्रापूर मार्गावर सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. चाकणला वाहतूक कोंडीचे ग्रहण हे लागले आहे. हे ग्रहण काही सुटत नाही, अशी भयानक अवस्था आहे. वाहनांच्या अगदी एक, दोन किलोमीटर रांगा लागत आहे. त्यामुळे नागरिक, प्रवाशी, कामगार, विद्यार्थी सारेच संतप्त झाले आहेत.
 
सकाळ पासूनच पुणे नाशिक महामार्गावर दुतर्फा वाहनांच्या सुमारे एक ते तीन किलोमीटर रांगा लागलेल्या असतात, कोंडीत सापडलेली वाहतूक सुरळीत करताना वाहतूक पोलीस कर्मचारी व त्यांना सहाय्य करणारे ट्राफिक वार्डन यांची तारांबळ उडते. पुणे नाशिक महामार्गावर स्पाईन रोड सिग्नल पासून, मोशी चौक, भारत माता चौक चिंबळी मोई फाटा, कुरळी फाटा स्पायसर चौक, आंबेठाण चौक (संत सावता माळी चौक) वाकी रोहकल फाटा या चौकात सिग्नलला वाहतुकीच्या लांबच्या लांब रांगा लागलेल्या असतात.
 
दरम्यान, दिवसेंदिवस वाढणार्‍या वाहतूक समस्येकडे विकासकामांचे फ्लेक्स लावून श्रेय लाटणार्या राजकीय नेत्यांना लक्ष द्यायला वेळ नाही, अशी टीका नागरिकांनी केली आहे. २०१४ मध्ये नाशिक फाटा ते चांडोली, राजगुरूनगरपर्यंतच्या महामार्गाचे सहापदरीकरण मंजूर करण्यात आले होते. त्याला पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या तत्कालीन कारभार्‍यांनी विरोध केला. परिणामी हा प्रकल्प लांबला. वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी नाशिक फाटा ते चांडोली आणि चाकण ते तळेगाव एलिव्हेटेड कॉरिडॉर म्हणजे दुमजली रस्ता करण्याच्या घोषणा झाल्या आहेत. मात्र, प्रत्यक्षात कामाला सुरुवात कधी होणार आहे. हे कुणी स्पष्ट सांगत नाही. तोपर्यंत वाहतूक कोंडीची समस्या अशीच राहणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
 
चाकण औद्योगिक पट्ट्यामुळे या भागातील लोकसंख्या आणि वाहने वाढली आहेत. त्यामुळे सध्याचा चौपदरी रस्ता अगदीच अपुरा पडत आहे. या भागात आणखी काही कंपन्या येणार आहेत. तसेच त्या पाठोपाठ अनेक मोठे गृहप्रकल्प होऊ घातले आहेत. एमआयडीसीचा पाचवा टप्पा पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. त्यानंतर या समस्येत आणखीनच भर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे महामार्गांचे काम होणे काळाची गरज आहे.

Related Articles