नाशिकमध्ये जन्मदात्यांनीच आवळला मुलाचा गळा   

नाशिक : दारूच्या नशेत वाद घालणार्‍या मुलाची आई-वडिलांनीच ओढणीने गळा आवळून हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी विशाल पाटील याचे वडील गोकुळ पाटील, आई शशिकला पाटील आणि मेव्हणा उमेश काळे या तिघांना अटक केली आहे. विशाल पाटील (वय ३४) असे हत्या झालेल्या तरूणाचे नाव असून, तो शनिवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास दारूच्या नशेत घरी आला होता. घरी आल्यानंतर त्याने वडील गोकुळ पाटील, आई शशिकला पाटील आणि मेव्हणा उमेश काळे यांना शिवीगाळ करत मारहाण सुरू केली. 
 
दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून घरातील भांडी घेऊन ती तो विकायला घराबाहेर पडत होता. हे पाहताच आई, वडील आणि मेव्हणा उमेश काळे या तिघांना राग अनावर झाला. त्यांनी विशालला बेदम मारहाण केली. त्यानंतर ओढणीच्या साहाय्याने त्याचा गळा आवळला. मृतदेह काही वेळ घरात ठेवून तो शासकीय रूग्णालयात नेण्यात आला. डॉक्टरांनी विशालला मृत घोषित केले. शवविच्छेदन अहवालात गळा दाबल्यामुळे मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. यानंतर गंगापूर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस अधिक तपास करत आहेत.

Related Articles