बारामतीत दूषित पाणीपुरवठा   

बारामती, (प्रतिनिधी) : बारामती शहरातील साठे नगर आणि अमरावती भागात मागील काही महिन्यांपासून दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. नगरपालिकेच्या नळाद्वारे होणार्‍या पिण्याच्या पाण्यात घाण व दुर्गंधी जाणवत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत. या पाण्यामुळे अनेकांना पोटदुखी, उलट्या आणि इतर आजारांना सामोरे जावे लागत आहे. 
 
स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही नगरपालिका प्रशासनाकडून  कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. विशेष म्हणजे, नगरपालिकेशी संपर्क साधला असता संबंधित अधिकारी यांनी आमच्याकडे अद्याप एकही तक्रार आलेली नाही असे उत्तर दिले आहे. त्यामुळे प्रशासनाचे दुर्लक्ष आणि उदासीनता समोर येत आहे.
 
साठे नगर मधील भागात चक्क दूषित पाण्यासह पाण्यात आळी निदर्शनास आल्याचे नागरिकांनी केसरीशी संपर्क साधून सांगितले. दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून लवकरात लवकर हा प्रश्न सोडवावा, अन्यथा आंदोलनाचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे. दरम्यान, नगरपालिकेने या भागातील पाणी तपासणी करून अहवाल प्रसिद्ध करावा आणि दोषी पाइपलाइनची दुरुस्ती करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
 

Related Articles