लीला गांधी पुण्याचे वैभव   

मुरलीधर मोहोळ यांचे प्रतिपादन 

पुणे : ज्येष्ठ सिने नाट्य अभिनेत्री लीला गांधी या पुण्याचे वैभव आहेत. त्यांचा सन्मान म्हणजे आपल्या सर्वांचा सन्मान आहे. त्यांना पद्म पुरस्कार मिळावा यांची शिफारस राज्य सरकारच्या माध्यमातून आपण केंद्र सरकारकडे करू, असा शब्द केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मंगळवारी दिला. बालगंधर्व परिवारातर्फे बालगंधर्व रंगमंदिरच्या वर्धापनदिनानिमित्त ’बालगंधर्व जीवनगौरव पुरस्कार’ लीला गांधी यांना मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते उल्हास पवार, अ.भा मराठी नाट्य परिषदचे अध्यक्ष प्रशांत दामले, डॉ. संजय चोरडिया, सिद्धार्थ शहा, अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, किरण गुजर, बालगंधर्व यांच्या नातसून अनुराधा राजहंस, राजेश कामठे, बालगंधर्व परिवाराचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले उपस्थित होते.
 
मोहोळ म्हणाले, गेली ५७ वर्ष बालगंधर्व रंगमंदिराचा वर्धापन दिन सोहळा साजरा केला जात आहे. त्यातून पुण्याची सांस्कृतीक ओळख जपली जात आहे. उल्हास पवार म्हणाले, पू. ल. देशपांडे यांच्या संकल्पनेतून बालगंधर्व रंगमंदिराची निर्मिती झाली. बालगंधर्वांच्या नावाने दिला जाणार पुरस्कार लीला गांधी यांना मिळतोय याचा आनंद आहे.प्रशांत दामले म्हणाले, ज्यांना नाट्यगृहांबद्दल काहीही माहिती नाही असे लोक नाट्यगृह बांधत आहेत. नाट्यगृह बांधल्या नंतर सुधारणा करण्यापेक्षा आधीच नियोजन करणे गरजेचे आहे.  
 
लीला गांधी म्हणाल्या, वयाच्या नवव्या वर्षा पासून मी कलाक्षेत्रात कार्यरत आहे. आजपर्यंत अनेक हिंदी, मराठी चित्रपटात काम केले आहे. हिंदीत सर्वात प्रथम नृत्य दिग्दर्शन करण्याची संधी मला मिळाली. आपले कला क्षेत्रातील हे योगदान पाहता आपल्याला पद्म पुरस्कार मिळावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी अक्षय परांजपे, कल्याणी फडके-केळकर, अशोक घावटे, जयराम पोतदार, आशा खाडीलकर आदींना बालगंधर्व गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मेघराज राजेभोसले यांनी प्रास्ताविक केले. शोभा कुलकर्णी यांनी सुत्रसंचालन केले. 

Related Articles