मैलापाणी शुद्धीकरण केंद्रातील पाणी तळजाईवरील झाडांसाठी   

पुणे : महापालिकेच्या विठ्ठलवाडी येथील मैलापाणी शुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया केलेले पाणी तळजाई टेकडीवरील वनसंपदेसाठी उपयोगात आणले जाणार आहे. यासंदर्भात महापालिकेच्या प्रस्तावाला आता वन विभागाकडून प्रतिसाद मिळू लागला आहे. यासंदर्भातील बैठक नुकतीच पार पडली.
 
शहराचे फुफ्फुस म्हणून तळजाई टेकडीवरील वनक्षेत्र ओळखले जाते. या टेकडीवरील सुमारे २५७ हेक्टर क्षेत्रात वनराई आहे. या वनात काही वन्यप्राण्यांचे, पक्षांचे अस्तित्व आहे. या वनसंपदेचे जतन करण्यासाठी महापालिकेने विठ्ठलवाडी येथील एसटीपीमध्ये प्रक्रिया केलेले पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव तयार केला. याबाबत वन विभागाला पत्र पाठविण्यात आले होते. या वनक्षेत्रासाठी सध्या महापालिकेच्या पाणी पुरवठा वाहीनीच्या व्हॉल्व मधुन वन विभागाला पाणी जोड दिला आहे. वनक्षेत्रासाठी पिण्याचा वापर होत असल्याने, महापालिकेने सदर प्रस्ताव तयार केला.
 
वनीकरणासंदर्भात वनविभाग आणि महापालिकेकडून विविध उपक्रम राबविले जातात. त्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. यामध्ये विशेषत: उन्हाळ्याच्या कालावधीत पाण्याची गरज अधिक भासते. तळजाई टेकडीबरोबरच शेजारी असलेल्या पाचगाव पर्वती वनक्षेत्रातील वनीकरणासाठी दररोज किती पाण्याची आवश्यकता आहे, तसेच पाणी कोठे पोहोचवायचे त्याची माहीती कळवावी, अशी विनंती महापालिकेच्या विद्युत विभागाने वन विभागाला केली होती. 
 
गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात पाठविलेल्या पत्राला वनविभागाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता. बुधवारी यासंदर्भात वन विभागाचे अधिकारी आणि महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या उपस्थितीत प्राथमिक बैठक पार पडली.

पंप बसवावा लागणार 

या प्रस्तावावर वनविभागाकडून प्रतिसाद येऊ लागला आहे. पाणी कोठे न्यायचे, पाईपलाईन कशा टाकाव्यात याचा आराखडा तयार आहे. पाणी उचलण्यासाठी पंपही बसवावा लागणार आहे. 
 
- मनिषा शेकटकर, उपायुक्त, विद्युत विभाग.
 

Related Articles