झारखंडमध्ये शाळेत पूराचे पाणी; १६२ विद्यार्थी अडकले   

समाज माध्यमावरील माहितीवरून पोलिसांचे तातडीने बचावकार्य

रांची : झारखंडमधील जमशेदपूर येथे झालेल्या जोरदार पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या पावसामुळे लव कुश निवासी शाळेत पाणी शिरल्याने येथे १६२ विद्यार्थी अडकले होते, परंतु विद्यार्थी आडकल्याची माहिती समाज माध्यमावरून मिळताच जमशेदपूर पोलिसांनी तातडीने धाव घेत विद्यार्थ्यांची सुरक्षित सुटका केली. या विद्यार्थ्यांना दोरखंड आणि नौकांच्या साहायाने बाहेर काढण्यात आले.

ओडिशात ४ जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा

ओडिशातील बालासोर जिल्ह्यातील बुधबलंग, सुवर्णरेखा, जलाका आणि सोनो नद्या दुथडी भरून वाहत असून, या भागात महापुराचा धोका निर्माण झाला आहे. राज्य प्रशासनाने जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ अभियंत्यांना सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत. सुवर्णरेखा नदीचे पाणी धोका रेषेजवळ, तर जलाका नदीचे पाणी आधीच ती ओलांडले आहे. ओडिशात ४ जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुरीमध्ये जगन्नाथ रथयात्रेच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी केला आहे. मयूरभंज, कटक, भद्रक आदी जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. अनेक घरांमध्ये पाणी घुसल्याने पूरजन्य स्थिती निर्माण झाली आहे.

हरयानात एक महिला ठार

हरयानामध्ये सर्व २२ जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. फरीदाबादमध्ये विजेचे तार रस्त्यावर कोसळल्याने स्कूटीवरील दोन महिला चिरडल्या गेल्या. यात ४२ वर्षीय तृष्णा विश्वास यांचा मृत्यू झाला, तर दुसरी महिला गंभीर जखमी झाली आहे.भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्राने केरळच्या समुद्रकिनार्‍यावर २ ते ३ मीटर उंच लाटांचा इशारा दिला आहे. 

सिंधू करारानंतर सलाल धरणाचे दरवाजे खुले

जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यातील चिनाब नदीवरील सलाल धरणाचे दरवाजे पाण्याच्या वाढत्या पातळीमुळे खुले करण्यात आले. याआधी भारत सरकारने सिंधू जल करार रद्द केल्यानंतर पाण्याचा प्रवाह थांबवला होता.

मान्सून ९ दिवस आधीच देशभरात सक्रिय

मान्सूनने रविवारी राजस्थान, पश्चिम उत्तर प्रदेश, हरयाना आणि संपूर्ण दिल्ली व्यापली आहे. त्यामुळे आता मान्सून संपूर्ण देशभर सक्रिय झाला आहे. यंदा मान्सूनने त्याच्या सर्वसाधारण तारखेपेक्षा (८ जुलै) ९ दिवस आधीच देश व्यापला आहे.
 

Related Articles