संतांचे पालखी सोहळे पंढरपूर तालुक्यात   

संत ज्ञानदेव आणि संत सोपानदेवांच्या बंधूभेट सोहळ्याने वातावरण भक्तिमय

सूर्यकांत आसबे  

सोलापूर : आषाढी एकादशीसाठी विठुरायाच्या भेटीस निघालेल्या संतांच्या पालखी सोहळ्यांनी गुरुवारी पंढरपूर तालुक्यात प्रवेश केला आहे. पालखी मार्गावरील टप्पा या ठिकाणी संत ज्ञानेश्वर आणि संत सोपानदेव यांच्या बंधू भेटीचा अनुपम सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला.ज्ञानोबा माउली तुकाराम...या जयघोषाने अवघा आसमंत दुमदुमून गेला होता. टाळ आणि मृदंगाच्या गजरात बंधूभेटीचा सोहळा डोळ्यात साठवण्यासाठी हजारो विठ्ठल भक्तांनी गर्दी केली होती. गुरुवारी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांचे पालखी सोहळे एकाच मार्गावर आले. वेळापूर येथील मुक्काम आटपून ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा ठाकूरबुवा येथील रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी पोहोचला. रिंगण सोहळा पार पडल्यानंतर पालखी सोहळ्याने पंढरपूर तालुक्यात प्रवेश केला, तर बोरगावचा मुक्काम आटोपून जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा तोंडले बोंडले मार्गे पंढरपूर तालुक्यात पोहोचला. तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचा मुक्काम पिराची कुरोली येथे आहे.
 
पंढरपूर तालुक्याच्यावतीने टप्पा या ठिकाणी प्रशासन, तसेच विविध संस्थांच्यावतीने संतांच्या पालख्यांचे स्वागत करण्यात आले. सायंकाळी टप्पा येथे संत ज्ञानदेव आणि संत सोपानदेव यांच्या बंधूभेटीचा सोहळा पार पडला. त्यानंतर दोन्ही पालख्या भंडीशेगाव येथे मुक्कामी मार्गस्थ झाल्या. पालखी सोहळ्याचा प्रवास अंतिम टप्प्यात पोहोचला असून, ६ जुलै रोजी आषाढी एकादशीचा सोहळा आहे. तत्पूर्वी या पालख्या दशमी दिवशी पंढरपूरमध्ये दाखल होतील. राज्यभरातून आषाढी वारीसाठी निघालेले अन्य पालख्या आणि दिंडी सोहळेसुद्धा पंढरपूरच्या जवळआले आहेत. लवकरच ते शहरात दाखल होणार आहेत. पंढरपूरमध्ये आषाढी वारीसाठी भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर वाढली असून, श्री विठ्ठल-रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन रांगेत मोठ्या संख्येने भाविकांच्या रांगा लागल्या आहेत.
 

Related Articles