मार्केट यार्डात कामगार असुरक्षित   

कामगार संघटनेचे बाजार समितीला पत्र

पुणे : मार्केटयार्ड परिसरात रात्री उशिरापर्यंत सुरू असणार्‍या हॉटेल आणि टपर्‍यांमुळे बाहेरून बाजारात येणार्‍यांची संख्या वाढली आहे. परिणामी कामगारांना मारहाण केली जात आहे. भीतीपोटी कामगार काम करण्यास तयार होत नाहीत. त्यामुळे बाजार समितीने पुढाकार घेऊन बाहेरून येणार्‍यांना आळा घालावा. तसेच रात्रीच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करावी. अशी मागणी करणारे पत्र श्री छत्रपती शिवाजी महाराज कामगार संघटनेने बाजार समिती प्रशासनाला दिले आहे. 
 
रात्री सुरू असणार्‍या हॉटेल्स आणि टपर्‍यांमुळे बाहेरून बाजार आवारात येणार्‍या हुल्लड तरुणांचे प्रमाण वाढले आहे. त्यांच्याकडून कामगारांना अरेरावी केली जात आहे. हुल्लडबाज तरुण बाहेरून येऊ नयेत, यासाठी ठोस उपाययोजना करावी, अन्यथा ३० जूनपासून कांदा-बटाटा विभाग बंद ठेवण्याचा इशारा संघटनेच्या वतीने बाजार समिती प्रशासनाला देण्यात आला आहे. याबाबत पत्र कामगार संघटनेचे अध्यक्ष संतोष नांगरे आणि सचिव विशाल केकाणे यांनी दिले आहे. 
 
काही दिवसांपूर्वी कांदा-बटाटा विभागात एका गाळ्यावर झोपलेल्या कामगाराला हुल्लड तरुणांनी कांदे फेकून मारले. तर झोपलेल्या कामगारांना मारहाण करण्याच्या घटना घडत आहे. या पार्श्वभूमीवर कामगार संघटना आक्रमक झाली आहे. रात्री १० ते ३ या वेळेत बाजार आवारातील सर्व टपर्‍या, हॉटेल्स बंद ठेवाव्यात, तसेच, बाजार घटकांना ओळखपत्र द्यावे, जेणेकरून त्यांच्याशिवाय कोणीही बाजारात येणार नाही. या मागण्याची दखल न घेतल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

Related Articles