झाड तोडल्यास ५० हजाराच्या दंडाबाबत सरकारची माघार   

आजी-माजी वनमंत्र्यांची खडाजंगी

मुंबई, (प्रतिनिधी) : झाड तोडल्यास 50 हजारांचा दंड आकारण्याचा निर्णय मागच्या सरकारने घेतला होता. तसा वटहुकूमही काढण्यात आला होता. मात्र, सरकारने बुधवारी याबाबतचे विधेयक मागे घेतले. यावरून माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि विद्यमान वनमंत्री गणेश नाईक या भाजपच्या आजी-माजी मंत्र्यांमध्ये विधानसभेत खडाजंगी झाली.एकनाथ शिंदे सरकारच्या काळात तत्कालीन वनमंत्री मुनगंटीवार यांनी बेकायदेशीर वृक्षतोड रोखण्यासाठी 1 हजाराचा दंड 50 हजर केला होता. मात्र, मुनगंटीवार यांच्या कार्यकाळातील हा निर्णय आता मागे घेण्यात आला आहे. 

नवीन बदलासह कायदा आणू : वनमंत्री

विधेयकासंदर्भातील चर्चेत बोलताना वनमंत्री गणेश नाईक म्हणाले की, या विधेयकात झाडांची फांदी तोडणेही झाड तोडल्यासारखे आहे. झाड तोडले तर 50 हजारांचा दंड आहे. शेतकर्‍याने अजाणतेपणे झाड तोडले तरी 50 हजारांचा दंड होता. कुणाला तरी फायदेशीर ठरण्यासाठी हे विधेयक मागे घेतले जात नाही. मुनगंटीवार यांच्या हेतूविषयी शंका नाही. पण, तात्पुरता हा कायदा मागे घेत आहे. नवीन बदलासह कायदा आणू, असे आश्‍वासन नाईक यांनी दिले.
 

Related Articles