क्रिस वोक्सने उडविला राहुलचा त्रिफळा   

बर्मिंगहॅम : एजबॅस्टन कसोटी सामन्यात पहिल्यांदा फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. पहिल्या कसोटी सामन्यातील शतकवीर लोकेश राहुलच्या रुपात टीम इंडियाला पहिला धक्का बसला.  क्रिस वोक्सनं एका अप्रतिम इनस्विंग चेंडूवर त्याला त्रिफळाचित केले.इंग्लंडच्या गोलंदाजांकडून अचूक टप्प्यावर गोलंदाजी होत असताना लोकेश राहुल अगदी संयमी खेळी खेळताना दिसला. पण 26 व्या चेंडूवर त्याच्या संयमी खेळीला अवघ्या 2 धावांवर ब्रेक लागला.
 
भारतीय संघाच्या पहिल्या डावातील नवव्या षटकात क्रिस वोक्सनं लोकेश राहुलला फसवले. इंग्लंडच्या गोलंदाजाने ऑफ स्टंपच्या थोडा बाहेर टाकलेला चेंडू टप्पा पडल्यावर किंचित आत वळला अन् लोकेश राहुलच्या बॅटची कड घेऊन हा चेडू ऑफ स्टंपच्या अगदी वरच्या भागाच्या अगदी टोकाला लागला. बोल्ड झाल्यावर लोकेश राहुलला विश्वासच बसेना. तो मागे वळून वळून पाहत पॅव्हेलियनमध्ये परतल्याचे पाहायला मिळाले.
 
इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटीतील पराभवानंतर टीम इंडिया पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत बरोबरी साधण्याच्या इराद्याने मैदानात उतरली आहे. लीड्सच्या मैदानातील कसोटीनंतर बर्मिंगहॅमच्या मैदानातही इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सनं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लिश कंडिशनमध्ये पहिल्यांदा फलंदाजी करताना पहिल्या तासाभराच्या खेळात सलामीवीरासाठी मोठी कसोटी असते. संयमी खेळीसह लोकेस राहुलनं क्लास दाखवला. पण संघाच्या धावफलकावर अवघ्या 15 धावा असताना त्याच्या रुपात टीम इंडियाने आपली पहिली विकेट गमावली.
 
लोकेश राहुल हा अनुभवी बॅटर आहे. पहिल्या कसोटी सामन्यातील दोन्ही डावात त्याने कमालीची कामगिरी केली होती. लीड्सच्या हेडिंग्लेच्या मैदानात पहिल्या डावात 43 धावांची खेळी करणार्‍या लोकेश राहुलनं दुसर्‍या डावात शतक झळकावले होते. पण दुर्देवाने त्याच्या शतकासह टीम इंडियाच्या ताफ्यातून आलेल्या पाच शतकानंतही टीम इंडियाला पहिल्या कसोटी सामन्यात 5 विकेट्सनं पराभवाचा सामना करावा लागला होता. 

Related Articles