इराणच्या हक्कांसाठी आवाज उठविणार्‍या पाकिस्तानचा ’यू-टर्न’   

इराणच्या हल्ल्यांचा केला तीव्र शब्दांत निषेध

इस्लामाबाद : आतापर्यंत इराणच्या स्वसंरक्षणाच्या अधिकाराबद्दल बोलणार्‍या आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर त्याबाबत आवाज उठवण्याचा दावा करणार्‍या पाकिस्तानने आता यू-टर्न घेतला आहे. तोच पाकिस्तान आता इराणने केलेल्या हल्ल्यांचा निषेध करत आहे. मंगळवारी पाकिस्तानने कतारमधील अमेरिकेच्या विमान तळावर इराणने केलेल्या हल्ल्यांचा तीव्र शद्बांत निषेध केला आहे.पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ सौदी अरेबिया आणि कतारमधील राजदूतांना स्वतंत्रपणे भेटले आणि कतार आणि मध्य पूर्वेतील नागरिकांच्या संरक्षणासाठी प्रार्थना केली. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानेही एक निवेदन जारी करून इराणने केलेल्या हल्ल्यांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
 
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानेही इराणच्या हल्ल्यांचा निषेध केला आहे. मंत्रालयाने समाज माध्यमावर पोस्ट करत म्हटले, की ’पाकिस्तान कतारमधील अमेरिकन हवाई दलाच्या उदेद विमान तळावरील हल्ल्याचा तीव्र निषेध करतो.  त्यामुळे या प्रदेशात निर्माण झालेल्या गंभीर सुरक्षा परिस्थितीबद्दल आम्ही चिंतित आहेत. सर्व देशांच्या प्रादेशिक अखंडता आणि सार्वभौमत्वाच्या आदराच्या तत्त्वाचे उल्लंघन करण्याच्या अलीकडील घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो. आम्ही सर्व पक्षांना आंतरराष्ट्रीय कायद्यांतर्गत मूलभूत अधिकारांचे पालन करण्याचे आणि संयम बाळगण्याचे आवाहन करतो.
 
रविवारी अमेरिकेने इराणच्या फोर्डो, नतान्झ आणि इस्फहानसह अणुस्थळांवर हल्ला केला. यानंतर, इराणने बदला घेण्याचे बोलले आणि सोमवारी कतारमधील अमेरिकेच्या विमान तळावर क्षेपणास्त्र हल्ला केला, त्यानंतर संपूर्ण मध्य पूर्वेत तणाव वाढला आहे. आतापर्यंत इराणच्या हक्कांसाठी आवाज उठविणार्‍या  पाकिस्तानने लगेचच यू-टर्न घेतला आहे.

संवादाने समस्या सोडवा : शरीफ

एका पाकिस्तानी वृत्तवाहिनीला, शाहबाज शरीफ यांनी कतारी राजनयिकांना भेटल्याचे सांगितले. ते म्हणाले, ’आम्ही प्रार्थना करतो, की आमचे कतारी भाऊ-बहिणी आणि संपूर्ण मध्य पूर्व भाग सुरक्षित राहो.’ पाकिस्तानने नेहमीच मध्य पूर्व भागात शांतता प्रस्थापित करण्यास संवाद आणि राजनैतिक मुत्सद्देगिरीने सर्व समस्या सोडवण्यास पाठिंबा दिला आहे. 
 

Related Articles