दिल्‍ली प्रीमियर लीगमध्ये आर्यवीर कोहली खेळणार?   

मुंबई : विराट कोहलीने कसोटी आणि टी-20 फॉरमॅटला अलविदा केला असला तरी, कोहलीच्या घरातील एक व्यक्ती आता क्रिकेटच्या मैदानात चमकण्यासाठी सज्ज झाला आहे. विराटचा पुतण्या आर्यवीर कोहली लवकरच दिल्ली प्रीमियर लीगमध्ये (डीपीएल) खेळताना दिसणार आहे. विशेष म्हणजे, या लीगमध्ये वीरेंद्र सेहवागचे दोन्ही मुलगे, आर्यवीर आणि वेदांत सेहवागदेखील सहभागी होण्याची शक्यता आहे. दिल्ली प्रीमियर लीगच्या आगामी हंगामासाठी 2 आणि 3 जुलै रोजी लिलाव होणार आहे, ज्यात अनेक युवा खेळाडू सहभागी होतील. 
 
आर्यवीर कोहली हा लेग स्पिनर आहे. तो विराट कोहलीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांच्याकडून वेस्ट दिल्ली क्रिकेट अकादमीमध्ये प्रशिक्षण घेत आहे. आर्यवीरला सी श्रेणीत ठेवण्यात आले आहे. आर्यवीर सेहवाग आयपीएलदरम्यान त्याच्या काकांसोबत रॉयल चॅलेंजर्स बंगळूरच्या जर्सीमध्ये दिसत होता, पण आता तो दिल्ली प्रीमियर लीगमध्ये खेळणार आहे. वीरेंद्र सेहवागचे दोन्ही मुलगे दिल्ली प्रीमियर लीगमध्ये दिसणार आहेत. आर्यवीर सेहवाग मोठा मुलगा असून तो 17 वर्षांचा आहे. तो दिल्लीच्या अंडर 19 संघात आहे आणि त्याने नुकतीच मेघालयविरुद्ध 297 धावांची स्फोटक खेळी केली होती. या खेळाडूला डीपीएलच्या बी श्रेणीत ठेवण्यात आले आहे. वेदांत सेहवागला देखील बी श्रेणीत स्थान मिळाले आहे, जो दिल्लीच्या अंडर 16 संघात खेळतो. वेदांत हा ऑफ स्पिनर आहे.
 
दिल्ली प्रीमियर लीगमध्ये यावर्षी दोन नवीन संघ खेळणार आहेत. ईस्ट दिल्ली रायडर्स, नॉर्थ दिल्ली स्ट्राइकर्स, वेस्ट दिल्ली लायन्स, साउथ दिल्ली सुपरस्टार्स, पुरानी दिल्ली-6 आणि सेंट्रल दिल्ली किंग्स यांचा समावेश आहे. याशिवाय आउटर दिल्ली आणि नवी दिल्ली फ्रँचायझी देखील मैदानात दिसणार आहेत. गेल्या वेळी या लीगमुळे प्रियांश आर्या प्रकाशझोतात आला होता. प्रियांश आर्याने दिल्ली प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामात 6 चेंडूत 6 षटकार मारले होते.

Related Articles